मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रांत डिजिटायझेशनने आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याला खेळही अपवाद नाही. कबड्डी, अॅथलीटपासून हॉकी, क्रिकेटपर्यंत सर्वच खेळांत डिजिटायझेशनने दमदार ‘इनिंग’ने सुरुवात केली. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी किंबहुना खेळाचे बारकावे पडद्यावर आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर होत आहे. परिणामी, खेळाच्या डिजिटायझेशनला ‘अच्छे दिन’ आले. सोशल मीडियाच्या लाइव्ह स्ट्रीमिंगमुळे रिओ आॅल्मिपिकची भव्यता तंत्रज्ञानामुळेच प्रकर्षाने जाणवली.प्रो आणि विविध लीगमुळे कबड्डीसारख्या खेळातही डिजिटायझेशनच्या संकल्पनेने वाहवा मिळवली. कबड्डीत थर्ड अम्पायर, इलेक्ट्रॉनिक स्कोअर बोर्डचा वापर, सामन्यादरम्यान पडद्यावर ग्राफिक्सच्या सादरीकरणामुळे मराठमोळ्या खेळाला डिजिटल साज मिळाला. निर्णायक चढाई अथवा पकडीची ‘अॅक्शन रिप्ले’ पाहण्याची सोय उपलब्ध झाली. यामुळे खेळाडू आणि पंच यांच्यातील वाद संपुष्टात आले. मातीतील खेळाचे डिजिटायझेशन झाल्याने खेळामागच्या हालचाली पाहणे क्रीडाप्रेमींनीही पसंत केले.अॅथलीटसारख्या खेळाडूंचे रेकॉर्ड जतन करण्याची क्लिष्ट प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे अलीकडच्या वर्षात कालबाह्य ठरली. एका क्लिकवर खेळाडूंची कामगिरी, नवीन विक्रमांची नोंद तंत्रज्ञानामुळेच मिळाली. शिवाय मॅरेथॉनमध्ये ड्रोनचा योग्य वापर केल्याने खेळाची भव्यता दिसून आली. धावपटूंना कामगिरीचे अवलोकनाठी तंत्रज्ञानाची मदत झाली. चुरशीच्या स्पर्धेत तंत्रज्ञानामुळेच अचूक निर्णय देणे सोपे झाले. शिवाय थ्रो, फेक यांमध्येदेखील प्रगत तंत्रज्ञान आल्याने खेळाडूला वैयक्तिक सुधारणा करण्यास वाव मिळत आहे. त्याचबरोबर टाइमचीप, फिनिशिंग टाइम, जंप प्लेसिंग यांची अचुकता तंत्रज्ञानामुळे शक्य झाली असल्याचे मुंबई उपनगर अॅथलिट संघटनेचे सचिव रवी बागडी यांनी सांगितले.बॅडमिंटन खेळामध्ये स्पर्धांचे सॉफ्टवेअर निर्माण झाल्यामुळे खेळाडूंसाठी अधिक सुलभ झाले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्यापासून ते स्पर्धेचा अंतिम निकाल लागेपर्यंतच्या सर्व बाबी मोबाइलमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत; त्याचबरोबर जागतिक बॅडमिंटन महासंघाने गुणांकन पद्धतीनुसार खेळाडूंच्या कामगिरीचे अवलोकन करण्याचा निर्णयदेखील डिजिटायझेशनमध्ये येत असल्याचे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी सांगितले. हाय स्पीड कॅमेऱ्याच्या वापरामुळे ‘शटल’ कोर्टाच्या आत आहे की बाहेर हे समजल्याने निर्णयात अचुकता आली. रिओ आॅलिम्पिकमध्ये अशा प्रकारे डिजिटायझेशनचा प्रभावी वापर क्रीडाप्रेमींनी अनुभवला. (प्रतिनिधी)
तंत्रज्ञानामुळे खेळाचेही झाले डिजिटायझेशन
By admin | Published: January 02, 2017 4:06 AM