एशियाटिकच्या ग्रंथसंपदेचे होणार डिजिटायझेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:09 AM2021-08-23T04:09:47+5:302021-08-23T04:09:47+5:30
मुंबई : एशियाटिक सोसायटीतील दुर्मीळ ग्रंथ व हस्तलिखितांना डिजिटल स्वरूप देण्यात येणार आहे. या माध्यमातून लवकरच या सोसायटीतील हजारो ...
मुंबई : एशियाटिक सोसायटीतील दुर्मीळ ग्रंथ व हस्तलिखितांना डिजिटल स्वरूप देण्यात येणार आहे. या माध्यमातून लवकरच या सोसायटीतील हजारो ग्रंथांना नवी झळाळी मिळणार आहे. नुकतेच राज्य शासनाने सोसायटीच्या या प्रकल्पाकरिता एक कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
एशियाटिक सोसायटीकडे लाखमोलाचे दुर्मीळ ग्रंथ आणि हस्तलिखिते आहेत. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांतील अभ्यासाचा ठेवा असलेले हे मौलिक ग्रंथ भावी पिढीला अभ्यास व संशोधनासाठी मोलाचे ठरणार आहेत. यापूर्वी सोसायटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेल्या अनुदानाच्या वेळी डिजिटायझेशनचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला होता. त्यानुसार सुमारे २० ते २२ टक्के काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले आहे, अशी माहिती सोसायटीने दिली आहे. या योजनेंतर्गत केलेल्या कामाचा अहवाल एशियाटिक सोसायटीने मुंबईतील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या संचालकांना सादर करावा. तसेच, याबाबत एशियाटिक सोसायटीने केलेल्या कामाचा आढावा घेऊन ग्रंथालय संचालकांनी हा अहवाल राज्य सरकारला सादर करावा, अशा स्पष्ट सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत.
या विशेष अनुदानाचा मार्ग आता मोकळा झाला असून या माध्यमातून आता एशियाटिकच्या खजिन्यापैकी सुमारे ४० ते ४५ टक्के पुस्तकांचे डिजिटायझेशन होण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण डिजिटायझेशनसाठी आणखी १५ कोटींच्या निधीची गरज असल्याचे एशियाटिक सोसायटीकडून सांगण्यात येत आहे. या ग्रंथसंग्रहालयामध्ये १,९३,४०० इतकी ग्रंथसंख्या असून दोलामुद्रिते ५,००० आहेत. या ग्रंथालयामध्ये हस्तलिखित पोथ्या, विविध लेखकांचे साहित्य, हस्ताक्षरे यांचा संग्रह असून त्यांचे जतन, संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता या दुर्मीळ ग्रंथांचे व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.