नवी मुंबई : एमआयडीसीच्या ताब्यातील अग्निशमन केंद्रांचे महापालिकेकडे हस्तांतर करण्याच्या मुद्द्यावर मागील ११ वर्षांपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मात्र एमआयडीसीची अडेलतट्ट भूमिका हस्तांतराच्या प्रक्रियेत खोडा ठरत आहे. परिणामी औद्योगिक क्षेत्रातील बचाव कार्याला मर्यादा पडत आहेत.पंचवीस किलोमीटरच्या क्षेत्रफळावर विस्तारलेल्या टीटीसी औद्योगिक क्षेत्रात सध्या लहान - मोठी ३५०० युनिट्स कार्यरत आहेत. यात अनेक रासायनिक कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे आगीच्या लहान मोठ्या दुर्घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. त्या तुलनेत आग प्रतिबंधक उपाययोजना तोकड्या असल्याचे दिसून आले आहे. या संपूर्ण परिसरासाठी एमआयडीसीची केवळ दोनच अग्निशमन केंद्रे आहेत. त्यातही साधनसामग्री आणि मनुष्यबळाची कमतरता असल्याने बचाव कार्यात या केंद्रांना मर्यादा पडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रे महापालिकेने आपल्याकडे वर्ग करून घ्यावीत, त्यादृष्टीने एमआयडीसी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तशा आशयाचा प्रस्तावही अनेकदा महापालिकेला पाठविण्यात आला आहे. मात्र या केंद्रांच्या हस्तांतरासाठी एमआयडीसीला आर्थिक मोबदला हवा आहे. त्याला महापालिकेचा ठाम विरोध आहे. त्यामुळे मागील ११ वर्षांपासून हा प्रश्न जैसे राहिला आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर नियमानुसार एमआयडीसीने आपल्या ताब्यातील अग्निशमन केंद्रे महापालिकेकडे वर्ग करणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती असताना आर्थिक मोबदल्याचा प्रश्नच कुठून येतो, असा सवाल महापालिकेच्या प्रशासन विभागाचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी उपस्थित केला आहे. विद्यमान कर्मचाऱ्यांसह आम्ही ही अग्निशमन केंद्रे विनाअट हस्तांतरित करून घ्यायला तयार आहोत. त्यासाठी एमआयडीसीने पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही सिन्नरकर यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
अग्निशमन हस्तांतराला एमआयडीसीचा खोडा
By admin | Published: June 26, 2015 1:45 AM