आरे रुग्णालयाची दुरवस्था; पालिकेच्या ताब्यात द्यावे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: June 10, 2023 06:23 PM2023-06-10T18:23:24+5:302023-06-10T18:25:41+5:30
परिणामी येथील सुमारे ५०००० नागरिकांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागते.
मुंबई : १९७१ मध्ये सुरू झालेल्या आरे रुग्णालयाची दूरावस्था झाली असून सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत ओपीडी असते. येथे एकच डॉक्टर आणि एक नर्स आहे. १९३२.२० चौ मीटर क्षेत्रफळ असलेले आरे हॉस्पिटल महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरे रुग्णालय दुग्धविकास विभागाने १५ फ्रेब्रुवारी २०१६ रोजी परिपत्रक काढून आरे रुग्णालय महानगर पालिकेला ताब्यात देण्यास मान्यता दिली होती, मात्र दुग्धविकास विभाग व महानगर पालिका यांच्या वादात या रुग्णालयात सुविधेचा अभाव आहे. परिणामी येथील सुमारे ५०००० नागरिकांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागते.
आरेतील अंतर्गत रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे देण्याबाबतचे परिपत्रक कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे उप सचिव नि. भा. मराळे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ६ जून २०२३ रोजी महापालिका आयुक्त यांच्या नावे काढले होते. आरे दुग्ध वसाहतीतील सुमारे ४५ कि. मी लांबीचे अंतर्गत रस्ते दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. आता आरे रुग्णालय देखिल पालिकेने ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता द्यावी, अशी मागणी आरेवासीयांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याठिकाणी साप चावल्यास,बिबट्याने हल्ला केल्यास किंवा एखादी मोठी दुर्घटना अथवा अति आजारी रुग्णास जोगेश्वरी येथील ट्रॉमा, गोरेगांव पश्चिम येथील पालिकेचे रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयात उपचार करावा लागतो. तसेच येथे २७ आदिवासी पाडे असून स्थानिक आदिवासी, शासकीय कर्मचारी तसेच येथील ४६ झोपडपट्टीत राहणाऱ्या जनतेला या रुग्णालयात कोणतीही आरोग्य सुविधा नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे आम्ही कुठे जावे असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.
या रुग्णालयातील वेतन हे शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभाग देते औषध व जागा ही दुग्धविकास विभागाची आहे मग हे आरेतील रुग्णालय सर्व सुविधेसह पालिकेच्या आरोग्य विभागाला हस्तांतरित केल्यास आरेतील मध्यमवर्गीय जनता आरोग्य सुविधेपासुन वंचित राहणार नाही असे जोगेश्वरी महिला कॉंग्रेस तालुका महासचिव सुनिधि सुनिल कुमरे यांनी यांनी लोकमतला सांगितले.