लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा मुंबई महापालिकेने ठरलेले उद्दिष्ट फोल ठरले आहे. ४० टक्क्यांऐवजी २५ टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात फक्त १५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची कोंडी होणार असून, नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, असा दावा भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे.
मुंबईतील सर्व रस्त्यांचे सिमेंट-काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पालिकेला केल्या आहेत. त्यानुसार २ हजार ५० किमीपैकी २२४ किमीहून अधिक रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे. या व्यतिरिक्त ३९७ किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण कामे हाती घेण्यात आली होती. रखडलेल्या कामाबाबत माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र लिहिले आहे. शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात विलंब होत असल्याचे त्यात अधोरेखित केले. तसेच झोननिहाय कामांचा उल्लेख, सद्यस्थितीचा उल्लेख त्यांनी केला आहे. झोन ५, ६ आणि ७ मधील कामे अत्यंत कमी झाली असून या प्रत्येक झोनमध्ये केवळ २ किलोमीटर सीसी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे.
कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकारस्त्यांच्या कामात उशीर करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे. शिवाय कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस जारी करून त्यांच्या विरोधात काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया का सुरू केली जाऊ नये याबाबत स्पष्टीकरण मागवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणात दिरंगाई झाल्यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यात निकृष्ट रस्त्यांवरून खडतर प्रवास करावा लागेल. पालिकेने करदात्यांना पुरेशा रस्त्यांच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. तरच मुंबईकरांच्या जीवनमानाचा दर्जा चांगला राहील. - मकरंद नार्वेकर, माजी नगरसेवक