मुंबई : उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरीही धोका पूर्णपणे टळलेला नसल्याचे लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील परकार यांनी सांगितले. शुक्रवार, १५ एप्रिलच्या मध्यरात्री २ वाजता दिलीपकुमार यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना छातीत ‘ब्रॉन्कोन्युमोनिया’ आणि ‘युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’चा (यूटीआय) संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. उपचारानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या मूत्रपिंडाला संसर्ग झाल्यामुळे औषधे देताना त्याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे रुग्णालयातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. जलील परकार यांनी नमूद केले. पुढील २४ तास महत्त्वाचे आहेत. सहा डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली दिलीपकुमार यांना ठेवण्यात आले आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना अतिदक्षता विभागात हलवायचे की नाही, याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचेही डॉ. परकार यांनी सांगितले. दिलीपकुमार यांचे वय लक्षात घेता, फुप्फुस आणि मूत्रपिंडाला झालेला संसर्ग पसरू नये म्हणून देखील काळजी घेतली जात आहे. हृदय, यकृताच्या आणि अन्य महत्त्वाच्या तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत. या तपासण्यांचे अहवाल अजून आलेले नाहीत. सध्या सुरू असलेले उपचार पुढे २४ तास सुरूच राहणार आहेत. (प्रतिनिधी)अमिताभ बच्चन यांचे टिष्ट्वटदिलीपकुमार यांच्या प्रकृतीविषयी अमिताभ बच्चन यांनी टिष्ट्वट करून चाहत्यांना माहिती दिली आहे. अमिताभ यांनी दिलीपकुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांना मेसेज करून दिलीपकुमार यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ‘दिलीपसाब यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून आम्ही प्रार्थना करीत आहोत,’ हा सायर बानू यांनी दिलेला रिप्लाय अमिताभ यांनी टिष्ट्वट केला आहे. त्यामुळे दिलीपकुमार यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. रुग्णालयात सायरा बानू आणि त्यांचे काही आप्तेष्ट त्यांच्या सोबत आहेत.
दिलीपकुमार यांची प्रकृती स्थिर
By admin | Published: April 18, 2016 2:03 AM