मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाले आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ९८ व्या वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सर्वसामान्य चाहतेही आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तर, दिग्गज सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आता, दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तशा सूचनाही दिल्या आहेत.
पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी 'मुगल-ए-आजम', 'देवदास', 'नया दौर', 'राम और श्याम' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९८ मध्ये आलेला 'किला' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. बॉलिवूडची पंढरी असलेल्या मुंबईशी दिलीप कुमार यांचं जवळंच नातं आहे. नाशिक, पुणे आणि मुंबई असा दिलीप कुमार यांचा प्रवास. त्यामुळेच, जगप्रसिद्ध असलेल्या लिजेंड भूमिपुत्राचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. दरम्यान, सांताक्रुझ येथील जुहू कब्रस्तान येथे सायंकाळी 5 वाजता दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजलीभारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलीप कुमार यांच्या आदरांजली वाहिली आहे. तसेच, दिलीप कुमार यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शनही घेतले. त्यानंतर, सायरा बानो यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.
मोदींचा सायरा बानो यांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिलीपसाहब यांच्या निधनानंतर, ही देशाची सांस्कृतिक हानी असल्याचे सांगत दु:ख व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सायरा बानो यांच्याशी फोनवर संवाद साधत त्यांना धीर दिला.