दिलीप राणे पॅनलचा विजय
By admin | Published: May 26, 2014 05:00 AM2014-05-26T05:00:04+5:302014-05-26T05:00:04+5:30
सहा हजार सभासद असलेल्या एनएमएसएस या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदासाठी आज एनएमएसएसमध्ये निवडणूक घेण्यात आली
नवी मुंबई : क्रिडा क्षेत्राचा विकास करणार्या नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या ( एनएमएसएस) कार्यकारिणी मंडळाच्या आज झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली डॉ. दिलीप राणे पॅनलचा दणदणीत विजय झाला तर नगरसेवक विठ्ठल मोरे यांच्या पॅनलचा दारुण परावभ झाला. सहा हजार सभासद असलेल्या एनएमएसएस या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदासाठी आज एनएमएसएसमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर लगेच संध्याकाळी मतमोजणी करून निकाल जाहिर करण्यात आला. या निवडणूकीत एकूण १२४८ सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी डॉ. दिलीप राणे यांनी बाजी मारली. त्यांनी विठ्ठल मोरे यांचा पराभव केला. डॉ. राणे यांना ७०१ तर मोरे यांना ५१८ मते मिळाली. सरचिटणीसपदी राणे पॅनलचे डॉ. एस.आर. फडणीस यांचा विजय झाला असून त्यांना ६२७ मते मिळाली आहेत. त्याचप्रमाणे खजिनदारपदी राणे पॅनलचे सुरेश वाझीराणी विजयी झाले आहेत. त्यांना ६१० मते प्राप्त झाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी मोरे पॅनलचे शिवाजी भोसकर यांना ५९९ मते पडली. सहसचिव म्हणून राणे पॅनलचे अरुण पाटील आणि दत्तू पाटील यांची याअगोदरच बिनविरोध निवड झाली आहे. विजयी उमेदवारांचे संजीव नाईक, आमदार संदीप नाईक तसेच ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक यांनी अभिनंदन केले आहे.