मुंबई:देवेंद्र फडणवीस यांना लहान वयात मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. आपल्या कामावर फोकस असणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. मात्र, आता विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना आणि विरोधक म्हणून भूमिका घेताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला कमीपणा येईल, असे काही करू नये. त्याकडे अधिक लक्ष द्यावे, हाच माझा त्यांना सल्ला आहे, असे दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले. राज्याचे गृहमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच लोकमतने घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात वळसे-पाटील यांची मुलाखत घेतली.
देवेंद्र फडणवीस हे फोकस असलेले व्यक्तिमत्त्व आहे. मात्र, विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना, प्रतिक्रिया देताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहिल्यास त्यांनाच त्याचा जास्त फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच धनंजय मुंडे हे चांगले राजकारणी आहेत, चांगले वक्ते आहेत, निर्णय प्रक्रिया चांगली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी अधिकाधिक लोकांशी संपर्क वाढवणे गरजेचे आहे, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
अजित पवार कामामध्ये वाघ
अजित पवार यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे ते कामामध्ये वाघ आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु, राजकारणात किंवा समाजासाठी काम करत असताना कामे कधीही संपत नाहीत. त्यामुळे राजकारण आणि कामाशिवाय अजित पवार यांनी गप्पा मारल्या पाहिजे, संपर्क साधला पाहिजे, तसाच तो वाढवला पाहिजे, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. तसेच अशोक चव्हाण यांना मी मुख्यमंत्री म्हणून, खासदार म्हणून पाहिले. तर नियोजनबद्ध कार्य करणारे ते नेते आहेत. मात्र, पक्षात आणि पक्षाबाहेर अशोक चव्हाण यांनी संपर्क आणि विस्तार वाढवला पाहिजे, असा सूचक सल्ला दिलीप वळसे-पाटील यांनी अशोक चव्हाण यांना दिला.
दरम्यान, काही तासांचे सरकार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी तयार केल्यानंतर त्यावेळी सर्वाधिक वेळ मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांच्याशी सखोल आणि विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळाली. त्या प्रसंगाशी आणि त्या व्यतिरिक्तही दोन दिवस सुमारे ८ ते ९ तास चर्चा केली, अशी आठवण दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितली.