Dilip Walse Patil: “नोकरीला लावण्यासाठी वडील शरद पवारांकडे घेऊन गेले होते, पण...”: दिलीप वळसे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 10:35 AM2021-10-23T10:35:09+5:302021-10-23T10:37:07+5:30
Dilip Walse Patil: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लोकमतच्या फेस टू फेस कार्यक्रमात अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
मुंबई: पदवी घेतल्यानंतर कुठेतरी नोकरी करावी, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी ते मला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडेही घेऊन गेले होते. परंतु, नोकरी करण्यापेक्षा राजकारणात जावे, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे १९८१ ते १९८८ या कालावधीत शरद पवारांचा स्वीय सचिव काम पाहिले. त्यामुळे अनेकांचा सहवास लाभला. ओळखी वाढल्या, अशी आठवण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी सांगितली.
लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या राजकारणाव्यतिरिक्त गप्पा मारल्या. या मुलाखतीत दिलीप वळसे-पाटील यांनीही मनमोकळेपणाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. शालेय शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी मुंबईत आलो. येथे येऊन कायद्याची पदवी घेतली. तसेच जर्नालिझमचा डिप्लोमा केला, असे दिलीप-वळसे पाटील यांनी सुरुवातीच्या शिक्षणाबद्दल सांगितले.
घरातूनच राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली
माझे वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील १९६७ ते १९७२ या कालावधी आमदार होते. वडिलांना त्यांच्या कामात मदत करायचो. तेव्हा नववी इयत्तेत असेन. वडील घरात असताना राजकीय चर्चा व्हायच्या. त्या अनेक गोष्टी कानावर यायच्या. त्यामुळे घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यानंतर राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्यावर वडिलांच्याच मतदारसंघात काम करण्याचा निर्णय घेतला. अधिक चांगला विकास करण्याचे ठरवले, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
पद मिळवणे हा हेतू कधीच नव्हता
राजकारणात येऊन पद मिळवणे हा हेतू कधीच नव्हता. परंतु, जो भाग अविकसित आहे, त्याचा विकास करणे, समाजासाठी काम करणे, राजकारणात आपले नशीब आजमावणे हाच मुख्य उद्देश होता, असे ते म्हणाले. सुरुवातीपासूनच मी शांत आहे. गरजेपेक्षा अधिक बोलत नाही. कुठे किती आणि कधी बोलावे, याचे शिक्षण शरद पवार यांच्याकडून मिळाले, असेही ते म्हणाले. तसेच त्यावेळी आजच्यासारखी प्रतिक्रिया देण्याची वेळ यायची नाही. पण आताच्या घडीला क्रियेपेक्षा अधिक महत्त्व आले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच अप टू डेट राहणे, आपल्या विषयाची आपल्याला अधिकाधिक आणि योग्य माहिती असावी, यांसारख्या असंख्य गोष्टी शरद पवार यांच्यासोबत काम करताना अनुभवायला आणि शिकायला मिळाल्या, असे दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले.