Dilip Walse Patil: ते भोंगे काढायचा प्रश्नच येत नाही; राज ठाकरेंच्या 'अल्टिमेटम'वर गृहमंत्री स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 04:26 PM2022-04-16T16:26:13+5:302022-04-16T16:32:15+5:30
न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदींवरील भोंगे उतरवा असे कुठेही म्हटले नाही
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळावा सभेनंतर मशिदींवरील भोंग्यावरुन वादंग निर्माण झाले आहे. या भाषणानंतर राज यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. या टिकेचा समाचार घेण्यासाठी त्यांनी ठाण्यात उत्तरसभा घेतली. विशेष म्हणजे ठाण्यातील सभेतूनही त्यांनी मशिदींवरील भोंग्याचा राग आवळला. तसेच, राज्य सरकारला 3 मे पर्यंत हे भोंगे उतरवण्याचा अल्टीमेटमही दिला आहे. आता, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या भोंग्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदींवरील भोंगे उतरवा असे कुठेही म्हटले नाही. न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपनाला बंदी घातली आहे. त्यामुळे, ज्या मशिदींनी, मंदिरांनी परवानगी घेतली आहे आणि कायद्याचं पालन जे करत आहेत, तेथील लाऊडस्पीकर काढायचा प्रश्नच येत नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास आम्ही मंदिरांवर लाऊडस्पीकर लावून, तेथे हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा दिला आहे.
मुंबई: कोल्हापूरचा विजय अपेक्षित होता, भाजपच्या धार्मिक प्रचाराला जनतेने नाकारलं; गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांची प्रतिक्रिया.#KolhapurNorth#KolhapurByElection#dilipwalsepatilpic.twitter.com/7n68JErdNG
— Lokmat (@lokmat) April 16, 2022
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी तब्बल 19 हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जल्लोष केला आहे. तसेच, हा विजय अपेक्षित होता, असेही म्हटले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही या विजयाबद्दल बोलताना, जनतेनं भाजपच्या धार्मिक प्रचाराला नाकारलं, कोल्हापूरचा विजय आम्हाला अपेक्षितच होता, असे म्हटलं आहे.