Join us

Dilip Walse Patil: “...म्हणून शरद पवारांनी मला साखर कारखाना दिला”; दिलीप वळसेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 11:33 AM

Dilip Walse Patil: साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसराचा विकासही झाला. शिक्षण संस्थाही उभ्या राहिल्या, असे दिलीप वळसे-पाटील यांनी नमूद केले.

मुंबई: पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा शरद पवार यांच्याकडे मतदारसंघासाठी महाविद्यालय असावे, अशी मागणी केली होती. मात्र, शरद पवार हसले आणि म्हणाले की, तुझ्या मतदारसंघात महाविद्यालयाची गरज नाही. तर साखर कारखान्याची गरज आहे. त्यामुळे साखर कारखान्यासाठीचा प्रस्ताव घेऊन ये, असे सांगितले. त्यानंतर आम्ही साखर कारखान्याचा प्रस्ताव दिला आणि शरद पवार यांनी आमच्या मतदारसंघात साखर कारखाना मंजूर केला. केवळ आठ महिन्यात साखर कारखाना उभा केला.  शरद पवार यांनी दूरदृष्टीने तो निर्णय घेतला होता. त्याचा आज सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. तो साखर कारखाना आताच्या घडीला आघाडीवर आहे, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. 

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी राजकारणाव्यतिरिक्त गप्पा मारल्या. यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी राजकारणातील प्रेरणा, कुटुंबाविषयीच्या आठवणी, शरद पवार यांच्यासोबत कामाचा अनुभव, वैयक्तिक आवडी-निवडी यांविषयी अगदी मोकळेपणाने सांगितले. पाण्याची व्यवस्था करायची होती, धरण पूर्ण करायचे होते, कालवे करायचे होते, शेतकऱ्यांना भाव मिळण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करायच्या होत्या, अशी कामे करून साखर कारखाना उभा केला आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसराचा विकासही झाला. शिक्षण संस्थाही उभ्या राहिल्या, असे त्यांनी नमूद केले.

ज्यांनी ज्यांनी मागितले, त्यांना डीएड कॉलेज मंजूर केले

मतदारसंघात डीएड कॉलेजची इच्छा त्यावेळी जरी राहिली, तरी त्यांनी डीएड नाही, पण बीएड कॉलेज मंजूर करून घेतले. आणि पुढे उच्च तंत्रशिक्षण मंत्री झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी बीएड, डीएड कॉलेजेस मागितली, ती मंजूर करून दिली, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे, प्रसिद्धीसाठी कोणतेही काम करत नाही किंवा केलेल्या कामाचे श्रेय घेत नाही, असेही त्यांनी पुढे बोलताना नमूद केले. श्रेयाची लढाई असली, तरी अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी उत्तम मदत केली. त्यामुळे श्रेय घेण्यापेक्षा यशस्वीरित्या काम पूर्ण करण्यावर अधिक भर राहिला, असे ते म्हणाले.  

म्हणून MKCL ची स्थापना करण्यात आली

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर आपल्याकडे संगणक साक्षरांची संख्या कमी होती. त्यावेळी तज्ज्ञांसोबत बरीच चर्चा झाली. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला. त्यातून महाराष्ट्र ज्ञान मंडळ म्हणजेच MKCL ची स्थापना करण्यात आली. त्याअंतर्गत ५ हजार केंद्रे राज्यभर उभी केली तसेच त्याकाळात सुमारे २० हजार तरुणांना यातून रोजगार प्राप्त झाला. याशिवाय लाखो नागरिक, विद्यार्थी संगणक साक्षर झाले. त्यावेळी घेतलेल्या निर्णयामुळे संगणक साक्षरतेत मोठी प्रगती साध्य होऊ शकली. पारंपारिक शिक्षणापेक्षा वेगळा विचार त्यावेळी करण्यात आला, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :दिलीप वळसे पाटीलशरद पवारलोकमत