दिंडोशी विधानसभा : अनधिकृत बांधकामांचे पेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 03:22 AM2019-09-30T03:22:43+5:302019-09-30T03:22:57+5:30
मालाड पूर्व येथील खडकपाडा येथे म्हाडाच्या भूखंडावर सध्या अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.
मुंबई : मालाड पूर्व येथील खडकपाडा येथे म्हाडाच्या भूखंडावर सध्या अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. येथील भूखंडावर शेकडो अनधिकृत बांधकामे रातोरात उभी राहिली असून, याकडे म्हाडा आणि महापालिकेचे दुर्लक्षच होताना दिसत आहे. दिंडोशीमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या या अनधिकृत बांधकामांसह विविध समस्यांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.
दिंडोशी खडकपाडा येथे म्हाडाचा भूखंड असून, येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम होत आहे. यामध्ये झोपड्यांसह विविध कार्यालयांचाही समावेश आहे. या प्रकरणी म्हाडाकडे अनेक तक्रारी करण्यात येत आहे. मात्र, याकडे दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे स्थानिक रहिवाशी विलास घुले यांनी सांगितले. तक्रार करूनही महापालिका आणी म्हाडा अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद येत नाहे.
गेल्या काही दिवसांमध्ये खडकपाडा येथे जेसीबीचा वापर करून जमीन मोकळी करण्याचे काम जोरात सुरू आहे. रातोरात या ठिकाणी २०० ते ३०० झोपड्या उभारण्यात आल्या असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, या भागामध्ये अनधिकृत बांधकामाची संख्याही वाढत आहे. निवडणूक काळामध्ये ही पद्धतशीर चाल रचली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
म्हाडाच्या भूखंडांवर अवैध बांधकामे
म्हाडा प्राधिकरणाला मुंबईमध्ये गृहसाठा निर्माण करण्यास अपयश येत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे अवघ्या २१७ घरांची सोडत काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीपुर्वी तरी काही प्रमाणात गृहसाठा मिळेल, अशी आशाही संपली आहे.
वेगवेगळ्या धोरणांमुळे म्हाडाकडील भूखंड आणि गृहसाठा पूर्णत: घटला आहे. म्हाडाच्या मोकळ्या भूखंडावर वाढती अनधिकृत बांधकामे
हे त्यामागचे एक कारण
आहे.
मालाडमध्ये भूमाफियांनी विविध यंत्रणांना हाताशी धरून तिथे बेकायदा कामे सुरू केली आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याने यामध्ये म्हाडा अधिकाऱ्यांकडेही संशयाची सुई वळली आहे.