गृहमंत्रालयाचे आदेश धुडकावून दिंडोशी महोत्सवाचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 03:55 PM2021-02-14T15:55:41+5:302021-02-14T16:02:30+5:30
ठिकाणी व लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याखान, किर्तन, मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली असून केवळ ऑनलाईन पद्धतीने हे कार्यक्रम घ्यावेत, असेही गृह खात्याने सुचवले आहे.
मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासन व पालिका प्रशासन यानी घालून दिलेल्या अटी व नियमांची पायमल्ली करत गोरेगाव (पूर्व) सामना परिवारच्या बाजूला खडकपाडा येथील मोकळ्या जागेवर दिंडोशी उत्सव साजरा केला जात आहे. येत्या दि. 16 फेब्रुवारीपासून 10 दिवस येथील दिंडोशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
1 फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत सर्वांसाठी।लोकल सेवा सुरू केल्यानंतर गेले काही दिवस रोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.आता दिंडोशी सारखे उत्सव आयोजित करून आयोजक कोरोनाला निमंत्रणच देत असल्याचा सवाल येथील नागरिकांनी विचारला आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात एकही सण किंवा उत्सव थाटामाटात, धुमधडाक्यात साजरा करता आला नाही. गेल्या वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली होती. त्यानंतरचा, एकही सण साजरा झाला नाही. कारण, मार्च महिन्यात कोरोनाचे संकट देशावर घोंगवायला लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 22 मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. देशाच्या इतिहासात प्रथमच इतक्या दिवस देश ठप्प झाला होता. त्यानंतरही कित्येक महिने देशात लॉकडाऊन राहिला. आता, लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले असले तरी कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या गृह विभागाने परिपत्रक जारी करुन शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि,19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होत आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आणि नियमावली बंधनकारक असल्याने सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी प्रशासनाने नाकारली. यासंदर्भात गृह मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे.
ठिकाणी व लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याखान, किर्तन, मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली असून केवळ ऑनलाईन पद्धतीने हे कार्यक्रम घ्यावेत, असेही गृह खात्याने सुचवले आहे.
अशातच दिंडोशी विभागात दिंडोशी महोत्सवाचे आयोजन समता परिषदेतर्फे विलास घुले यांनी केले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती धुमधडाक्यात मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यावर शासनाने नियमावली केली असता दिंडोशी महोत्सवासारखे कार्यक्रम कसे आयोजित केले जातात आणि त्यांना मनपा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही असा जोरदार आक्षेप सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
सदर दिंडोशी महोत्सवात प्रतिबंध असलेले आकाशी पाळणे उभारण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांचे स्टॉल यांना मनपाचे आवश्यक असलेले आरोग्य परवाना, फायर परवाना, फुड परवाना, इतर आवश्यक परवाने मनपाकडून न घेता सदर कार्यक्रमाचे नियोजन होत असताना मनपा व पोलीस प्रशासन कारवाई करिता काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शिव जयंती साजरी करण्याला नियमावली लागते. परंतु याच परिसरात होणारे राजकीय कार्यक्रम अनधिकृत या होणाऱ्या बांधकामांना कोणतीही परवानगी लागत नाही. अनेकदा या परिसरात अग्नितांडव नागरिकांनी पाहिले आहे. त्यामुळे आता दिंडोशी महोत्सवावर कारवाई काय होणार अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत