मनोहर कुंभेजकर, मुंबई: दिंडोशीतील नालेसफाई, खड्डे बुजवण्याच्या उपाययोजना, रस्ता रुंदीकरण बाबत प्रगती आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा याबाबत उद्धव सेनेचे मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडून आढवा घेतला.
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यां संदर्भात त्यांनी पी उत्तर विभाग कार्यालयात उपायुक्त आणि पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान दिंडोशी विभागातील नाले सफाई करण्याच्या सूचना दिल्या, गॅरंटी काळातील रस्त्यांवरील तसेच इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या. त्याच प्रमाणे संस्कार कॉलेज येथील डीपी रस्ता खुला करण्याच्या कामाची माहिती देखील आमदार सुनिल प्रभू यांनी घेतली व पात्र बाधितांचे पुनवर्सन लगतच्या परिसरात करण्याच्या सूचना दिल्या. त्याच प्रमाणे राणी सती मार्ग रुंदीकरणात बाधित घरांबाबत व अप्पा पाडा, क्रांतीनगर परीसरात होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्या बाबत चर्चा केली.
यावेळी माजी उपमहापौर अँड.सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, उपविभागप्रमुख गणपत वारीसे, पालिकेच्या परीरक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग, इमारत व कारखाने विभागातील अधिकारी, पर्जन्य जल वाहिन्या विभागातील अधिकारी, रस्ते विभागाचे अधिकारी उपस्थित होते.