मुंबई - दिंडोशी येथील न्यू म्हाडा कॉलनी येथील मागील बाजूस असलेल्या व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हिरवळीने नटलेल्या डोंगराला आज सायंकाळी आग लागली नसून ती लावण्यात आली, असा ठाम आरोप येथील स्थानिकांनी लोकमतशी बोलतांना केला.
येथे दरवर्षी डोंगराला आग लाऊन येथील डोंगर व हिरवळ,झाडे व झुडपे नष्ट केला जात असल्याचा आरोप येथील साद प्रतिसाद या संस्थेचे संदीप सावंत आणि शरद मराठे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.नेमेची मग येतो पावसाळा त्याप्रमाणे येथील आगीचे आहे अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.येथील 30 टक्के डोंगर अगदी करवती प्रमाणे कापला असून येथील पर्यावरणाचा नाश करून येथील वनसंपत्ती नष्ट केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.येथे डोंगरवर रहेजाचे इन्फिनिटी आयटी पार्क आहे.मात्र आग कोणी लावली त्यांचे नाव मी घेणार नाही, असे शरद मराठे म्हनाले.
आज संध्याकाळी 6.च्या सुमारास लागलेली आग अजून 9.30 वाजले तरी आगीचे कल्लोळ सुरूच असून येथील इमारतीच्या गच्चीवरून आग बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याची माहिती स्मिता धर्म यांनी दिली. येथील डोंगरच नष्ट केला जात असून वारंवार लागणाऱ्या येथील आगीची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी वॉच डॉग फाउंडेशनचे अँड.ग्रोडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी केली आहे. दरम्यान, आपण या आगी प्रकरणी माहिती घेतो असे येथील शिवसेनेचे स्थानिक आमदार, विभागप्रमुख,माजी महापौर सुनील प्रभू यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.