मुंबई - जुन्य पुणे-मुंबई हायवेवरील शिंगरोबा मंदिराच्या मागील घाटात आज पहाटे एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात घडला. यात मृत पावलेल्या दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील वीर बाजीप्रभू ढोल ताशाचे सहकारी सतीश धुमाळ, स्वप्निल धुमाळ, जुई सावंत, वीर मांडवकर, यश यादव, कृतिक लोहीत, राहुल गोठण या सात तरुणांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने दिंडोशीत शोककळा पसरली आहे. सकाळच्या सुमारास ही घटना समजल्यानंतर या तरुणांच्या लोकवस्तीत शोककळा पसरली पसरली आणि चूलही पेटली नाही.
सतीश धुमाळ, स्वप्निल धुमाळ, जुई सावंत, वीर मांडवकर आणि राहुल गोठण यांच्यावर रात्री उशिरा गोरेगाव पूर्व आरे चेक नाका येथील शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तर यश यादव, कृतिक लोहित यांचे मृतदेह त्यांचे नातेवाईक गावावरून येणार असल्याने जोगेश्वरी ट्रामा सेंटर येथे ठेवण्यात आल्याची माहिती माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर आणि प्रभाग क्रमांक 41चे माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी लोकमतला दिली.
आज सायंकाळी गोरेगाव पूर्व संतोष नगर महापालिका वसाहत के सेक्टर येथील चाळीत राहणाऱ्या वीर कल्पेश मांडवकर या आठ वर्षाच्या लहान मुलाचा मृतदेह सायंकाळी 6.15 वाजता त्याचा घरी आणण्यात आला. त्यावेळी त्याच्या मामाला अश्रू अनावर झाले. संबंधित चाळीतील एका खोलीत या मुलाचे अंत्य दर्शन घेण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी आणि येथील नागरिकांनी गर्दी केली होती. आई वडील गावावरून यायचे असल्याने रात्री उशिरा गोरेगाव पूर्व शिवधाम स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील, असे येथील नागरिकांनी सांगितले.
सामना परिवारासमोर दिंडोशी शिवनेरी सहकारी सोसायटीत राहणारा राहुल गोटल याचा मृतदेह त्याच्या घरी 6.30 वाजता आला.यावेळी येथील नागरिकांनी आणि महिलांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.तर आईने हंबरडाच फोडला होता. परिसरात शोकाकुल वातावरण होते. राहुलने नुकतीच 11 वीची परीक्षा दिली होती. त्याच्या निधनाने येथील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
शिवसेनेचे मदतकार्य -दरम्यान सदर घटना समजताच दिंडोशीचे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी सकाळी तातडीने माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर व प्रभाग क्रमांक 41 चे माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे,शाखाप्रमुख संदीप जाधव आणि शाखाप्रमुख संपत मोरे व युवासैनिकांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी मदत कार्यात आणि मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यात मोलाचे सहकार्य केले.