Join us

दिंडोशी भूखंड घोटाळा प्रकरण उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 7:04 AM

सिद्धकला भजनी मंडळाचा खेळाचे मैदान गिळंकृत करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  दिंडोशी मालाड पूर्व येथील सुमारे १००० मुलाना खेळण्यासाठी असलेले आरक्षित मैदान स्वताच्या फायद्यासाठी धर्माच्या नावावर व राजकीय दबाव आणत सिद्धकला हे भजनी मंडळ म्हाडा अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन हे मैदान गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघडकीस आले आहे. 

मालाड येथील सर्वे नं ११० म्हाडाची मनोरंजनासाठी आरक्षित भूखंड गेल्या ४० वर्षापासून तिथल्या स्थानिक लोकानी जपून  सार्वजनिक कामासाठी वापर करित होते. या मैदानावर म्हाडा वसाहत पठाण वाडी मकबुल कंपाउंड वीटभट्टी या वसाहतीतीतील मुलाना खेळण्यासाठी हेच एक मैदान आहे या मैदानावर क्रिकेट, कब्बडी,  शरीरसौष्ठव आदी विविध खेळ तसेच मालवणी जत्रौत्सव गरबासारखे कार्यक्रम गेल्या ४० वर्षापासून होतात. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाने सदर भूखंडामध्ये २००० चौरस फूट हे कलावती आईचे कायमस्वरूपी मंदिर बनविण्यासाठी सिद्धकला भजनी मंडळाला स्थानिक खासदार निधीतून पैसे उपलब्ध करून दिले. स्थानिक म्हाडा वसाहतीतील लोकानी गेल्या दि, २७ जानेवारी २०२१ रोजी मैदानात स्थानिक शिवसेना खासदार गजानन किर्तीकर, आमदार सुनील प्रभू, भाजपा नगरसेविका संगीता ज्ञानमूर्ती शर्मा आणी म्हाडा अधिकाऱ्यांना आपला विरोध दर्शविला होता.  त्यावेळी या लोक प्रतिनिधिनी मंदिर निर्माणाला स्थगिती देण्यास सांगितले होते, परंतू गेल्या दहा दिवसांपासून सिद्धकला भजनी मंडळाच्या महिलांनी या मैदानावर राजकीय दबाव आणत  उपोषण सुरू केले आहे असा आरोप माजी नगरसेवक ॲड. ज्ञानमूर्ती शर्मा यांनी केला. राज्यात १४४ कलम लागू असतानादेखील हे महिला मंडळ सायंकाळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 सदर मैदान हे बृहन्मुंबई क्षेत्राच्या सुधारित आराखड्यानुसार मनोरंजन मैदान असे आरक्षित असल्यामूळे इथे १० टक्क्यांपेक्षा जास्त भूखंडावर बांधकामाला परवानगी मिळू शकत नाही. या मैदानावर या आधीच १० टक्के पेक्षा जास्त भूखंडावर  बांधकाम झालेले आहे या मैदानाचे २००० चौरस फूट जागेचे बाजार मूल्य ३ करोड आहे. आणि म्हाडाने ही जागा सिद्धकला भजनी मंडळाला मोफत दिली असल्याचा आरोप ॲड. ज्ञानमूर्ती शर्मा यांनी केला.

मिळालेल्या माहितीनुसार सिद्धकला भजनी मंडळ हे नोंदणीकृत नसुन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एका खासदाराची बहीण चालवत असल्याने या मंडळावर म्हाडाची कृपादृष्टी झाली असल्याचे समजते.  महाराष्ट्र प्रादेशीक शहरी विकासकाच्या नियमांनुसार सरकारच्या कोणत्याही आरक्षित जागा या म्हाडा प्राधिकरण यांना धार्मिक मंडळाला हस्तांतरित करण्याची मुभा नाही.  उपअभियंता खान यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत त्यांनी माहिती नसून सदर प्रकरणाची माहिती घेऊन  सोमवारी  सांगतो, असे सांगितले.

मुलांना खेळण्यासाठी जागा नाहीयाबाबत माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यानी सांगितले की, या मैदानाच्या फेन्सिंगचे काम,जॉगिंग ट्रैक व ओपन जिम मनपाच्या फंडातून ५ वर्षांपूर्वी सुशोभित करून घेतले होते.  त्यावेळी संमीत्र मित्र मंडळ व येथील स्थानिक रहिवासी या मैदानाची देखभाल करित होते. परंतु आता सिद्धकला भजनी मंडळ येथे जागा मागत आहे ते चुकीचे आहे. हे खेळाचे मैदान आरक्षित असून येथील स्थानिक मुलांना खेळण्यासाठी  जागा नाही. उद्या इतर धर्माचे लोकदेखील मागणी करतील. या भजनी मंडळालाचा आम्हाला विरोध नाही, परंतु त्यांना दुसरी पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते.