मुंबई : चार ते पाच लाख लोकसंख्या असलेल्या मालाड पूर्व भागात माफक दरात डायलिसिस सेवा नव्हती आणि ती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते. त्यानुसार दिंडोशीमधील त्रिवेणीनगरमधील दिव्या अपार्टमेंटमध्ये रुग्णांसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने हे डायलिसिस केंद्र उभारले आहे.
दिंडोशीकरांना आता सवलतीच्या दरात डायलिसिस सेवा उपलब्ध होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून दिंडोशीत सवलतीच्या दरात डायलिसिस सेवा उपलब्ध होणार आहे.
या केंद्राचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार दि, २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. तसेच लाईफ लाईन मेडिकेअर हॉस्पिटल संचालित, ‘स्व.माँ. मीनाताई बाळासाहेब ठाकरे डायलिसिस केंद्र’ लवकरच सुरू होणार आहे. येथे १६ डायलिसिस मशीन उपलब्ध करण्यात आल्या असून, येथे सवलतीच्या दरात डायलिसिस सेवा मिळणार आहे, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली. यावेळी दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. ४१ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१ या शाळेच्या पाच मजली नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळादेखील मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.