दिनेश कुरेकरांच्या 'वुव्हनस्केप्स' चित्रांची कलाप्रेमींना मोहिनी
By संजय घावरे | Published: December 10, 2023 08:11 PM2023-12-10T20:11:00+5:302023-12-10T20:12:06+5:30
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये कलात्मक विणकामाच्या अनुपम कलाकृतींचे प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - चित्रकार दिनेश कुरेकर यांच्या 'वुव्हनस्केप्स : मास्टरपीसेस आॅफ क्रिएटीव्ह विव्हींग' हे खऱ्या अर्थाने अनोखे असणारे चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये कलाप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. निसर्गातील तत्त्वांचा सुरेख संगम घडवत कुरेकरांनी तयार केलेली चित्रे चित्रकला आणि शिल्पकलेच्या सीमारेषा ओलांडत एका वेगळ्याच विश्वात नेणारी आहेत.
ललित कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या दिनेश कुरेकर यांनी नावीन्यपूर्ण हाती विणकामाद्वारे लोकरीच्या आकर्षक धाग्यांना नैसर्गिक रंगात रंगवून कल्पनाचित्रे तयार केली आहेत. २५ वर्षांचा अनुभव आणि अथक प्रयत्नांच्या बळवर तयार केलेल्या कुरेकरांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत 'वुव्हनस्केप्स' हे प्रदर्शन भरले आहे. जहांगीरमधील कुरेकरांचे हे नववे सोलो चित्र प्रदर्शन असून, आजवर भारतात त्यांची ३५ चित्र प्रदर्शने झाली आहेत. हि सर्व अमूर्त आकारातील म्हणजेच अॅबस्ट्रॅक्ट चित्रे आहेत. लोकरीचा वापर करून वेगवेगळ्या तंत्राद्वारे हँड-नॅाटिंग म्हणजेच विणकाम करून ही चित्रे तयार केली गेली आहेत. 'वुव्हनस्केप्स'मागील संकल्पनेबाबत दिनेश कुरेकर म्हणाले की, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि एकूणच निसर्गाचा संगम घडवून वैविध्यपूर्ण रचना करून पेंटिंग्ज पूर्ण केली असून, गाठी गाठींतून विणलेली आहेत. याला 'नॅाटिंग सिस्टीम' म्हणतात. या प्रदर्शनामध्ये लहान-मोठी ५५ चित्रे मांडण्यात आली आहेत. हि पेंटिंग्ज तयार करण्यासाठी जवळपास सात-आठ वर्षे लागली. या शैलीद्वारे चार बाय चार फुटांचे एक चित्र सातत्याने बनवण्यासाठी साधारणपणे चार महिने लागतात. यासाठी दिवसातून किमान तीन-चार तासांचाही वेळ दिला आहे. रात्री उशीरापर्यंत जागूनही काही चित्रे तयार केली असल्यानेच हे शक्य झाल्याचेही कुरेकर म्हणाले.
कलेच्या क्षेत्रात चित्रकला आणि शिल्पकला हे दोनच विभाग येतात, पण या प्रदर्शनात मांडलेली चित्रे धागे, दोरे आणि रंगांच्या मदतीने तयार केली गेली असल्याने त्याला क्राफ्टही म्हणता येणार नाही. कपड्यावर तयार करण्यात आल्याने या चित्रांना चित्रकलेच्या पुढचे पाऊल असे या क्षेत्रातील तज्ज्ञ संबोधत असल्याचेही कुरेकर म्हणाले. आहे.
कुरेकरांनी चित्रांमध्ये मनाला आनंद देणारे, समाधान देणारे रंग वापरले आहेत. यातील काही पेंटिंग्जमध्ये रंगांचे शेकडो-हजारों इफेक्टस पाहायला मिळतात. यातील काही रंग वनस्पतीपासून, तर काही केमिकलपासून तयार करण्यात येतात. रंग दीर्घकाळ टिकावेत याचीही काळजी घेण्यात येते. यासाठी कित्येकदा केंद्र सरकारच्या टेक्सटाईल रिसर्च सेंटरमधून तसेच अहमदाबादहून रंग आणले जातात.
अशा प्रकारे चित्रे बनवण्यासाठी साधी लोकर चालत नाही, तर हाय ट्विस्टेड म्हणजेच जास्त पीळ असलेली वूल गरजेची असते. याची किंमत १२०० रुपये ते १८०० रुपये प्रती किलो आहे, जी विकत घेताना पांढरी असते. तिला प्रोसेस करून रंग देण्याच्या क्षमतेची बनवली जाते. त्यानंतर लोकरीला रंग दिला जातो. ही प्रोसेस खूप मोठी आहे. या पेंटिग्ज ४०-५० हजार रुपयांपासून पुढे लाखों रुपयांपर्यंत विकल्या जातात.