दररोज ८०० जणांना जेवणाची सुविधा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 07:07 PM2020-04-14T19:07:16+5:302020-04-14T19:07:43+5:30

साकीनाका येथील मशीदीद्वारे दररोज ८०० जणांना जेवणाची सुविधा  

Dining facilities for 800 people per day | दररोज ८०० जणांना जेवणाची सुविधा  

दररोज ८०० जणांना जेवणाची सुविधा  

Next

मुंबई  :  कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे दैनंदिन रोजगारावर अवलंबून असलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. साकीनाका येथील जामा मशीद अहले हदीस द्वारे परिसरातील अशा ८०० जणांना दररोज जेवणाची सुविधा पुरवली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिक भुकेलेले राहू नयेत यासाठी स्थानिक पातळीवर ही व्यवस्था करण्यात आली आहे. माणुसकीचा धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

जामा मशीद अहले हदीसचे विश्वस्त मौलाना आतिफ सनाबाली याबाबत म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे ही काळाची गरज आहे. मात्र त्याचवेळी भूकबळी जावू नयेत याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. आपल्या परिसरातील एकही व्यक्ती भूकेल्या अवस्थेत राहू नये यासाठी मशीद व्यवस्थापनातर्फे हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. साकीनाका परिसरात मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा दैनंदिन रोजगार हिरावला गेला असल्याने त्यांच्यासमोर जेवणाचा प्रश्न आ वासून उभा होता. त्यामुळे त्यांना जेवण देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मजूरांसाठी जेवण तयार करताना व जेवण वितरीत करताना सोशल डिस्टन्सिंग नियमाचे कठोरपणे पालन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात अनेक गरजूंना रेशन वाटप देखील करण्यात येत आहे. देशातील सर्व मशीदी व सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांवर अशा प्रकारे जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देणे ही सध्या काळाची गरज आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जेवणाचे हाल होऊ नये म्हणून मुंबईमध्ये विविध भागांत अकरा ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. युनायटेड सिंग सभा फाऊंडेशनतर्फे विविध भागांमधील अकरा गुरूद्वारांमध्ये ही भोजन व्यवस्था करण्यात येणार असल्याने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.  देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी महापालिकेसह अत्यावश्यक देणाऱ्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा पुरवत असलेल्या कर्मचाऱ्यांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील अकरा गुरूद्वारांमार्फत भोजन पुरवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. अग्निशमन दल कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित इतर कर्मचारी, महापालिका आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी यांची भोजन व्यवस्था करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. 

गुरूद्वारा दहिसर पूर्व, गुरूद्वारा बोरिवली पश्चिम, गुरूद्वारा मालाड पश्चिम, गुरूद्वारा गोरेगाव पश्चिम, गुरूद्वारा शेर ए पंजाब अंधेरी पूर्व, गुरूद्वारा शहीद भगतसिंग अंधेरी पूर्व, गुरूद्वारा चार बंगला अंधेरी पश्चिम, गुरूद्वारा गुरूनानक नगर घाटकोपर, गुरूद्वारा विक्रोळी पूर्व, गुरूद्वारा चेंबूर कॉलोनी, गुरूद्वारा मुलुंड पश्चिम अशा अकरा गुरूद्वारांच्या ठिकाणी ही भोजन व्यवस्था करण्यात येत आहे.

Web Title: Dining facilities for 800 people per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.