Join us  

उपाहारगृहांवर पालिकेचा बडगा

By admin | Published: October 22, 2015 2:43 AM

कुर्ला येथील उपाहारगृहात झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने सलग तिसऱ्या दिवशी महापालिका हद्दीतील उपाहारगृहांची तपासणी केली. यामध्ये सुमारे २२५ उपाहारगृहांची तपासणी

मुंबई : कुर्ला येथील उपाहारगृहात झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने सलग तिसऱ्या दिवशी महापालिका हद्दीतील उपाहारगृहांची तपासणी केली. यामध्ये सुमारे २२५ उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली असून अनियमितता आढळलेल्या उपाहारगृहांना नोटीसही देण्यात आल्या आहेत. तसेच उपाहारगृहांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावरही पालिकेने बुधवारी हातोडा चालविला असून उपाहारगृहातील सिलेंडरही जप्त करण्यात आले आहेत.महापालिका हद्दीतील सर्व उपाहारगृहांची तपासणी महापालिकेद्वारे सुरू करण्यात आली आहे. तपासणी आणि कारवाईसाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागांत प्रत्येक विभागस्तरावर एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकामध्ये संबंधित विभागाचे साहाय्यक आयुक्तांचा प्रतिनिधी, मुंबई अग्निशमन दल, अनुज्ञापन खाते, सार्वजनिक आरोग्य खाते, परिरक्षण खाते आदी खात्यांचे प्रतिनिधी आहेत. या पथकाद्वारे महापालिका क्षेत्रातील उपाहारगृहांची तपासणी करण्यात येत असून तपासणी दरम्यान अनियमितता आढळणाऱ्या उपाहारगृहांना नोटीस देऊन कारवाई करण्यात येत आहे.बुधवारी महापालिकेच्या पथकाने २४ विभागांमधील २२५ उपाहारगृहांची तपासणी केली. यामध्ये अनेक उपाहारगृहांमध्ये अनियमितता आढळून आली. पी/उत्तर विभागात महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून येथील १७ उपाहारगृहांची तपासणी केली. या उपाहारगृहांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच येथून १५ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. जी/दक्षिण विभागात महापालिकेच्या पथकाने ९ उपाहारगृहांची तपासणी केली. यामध्ये दादरमधील हॉटेल कोहिनूर पार्क आणि कोहिनूर बँक्वेट हॉल या उपाहारगृहांनी केलेली अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत.