Join us

Dipali Sayed: "माझ्या आधार कार्डवरही 'दिपाली सय्यद'च", शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 5:46 PM

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत, त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठका घेणार आहेत

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन चांगलाच वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. युपीतील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी युपीची माफी मागावी, मगच अयोध्या दौरा करावा, असे त्यांनी म्हटलं आहे. त्यातच, राज यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन शिवसेनेच्या महिला नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसेवर टिका केली होती. त्यास मनसेच्या नेत्यांनीही प्रत्युत्तरात दिपाली यांच्यावर निशाणा साधला. आता, दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मनसेला लक्ष्य केलं आहे. 

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत, त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठका घेणार आहेत. तसेच, राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. याबाबत देखील नियोजन करण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. त्यावरुन, दिपाली सय्यद यांनी मनसेला टोला लगावला. सभा करायच्याच असतील तर आयोध्यामध्ये करून दाखवा... पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून, असा टोला दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना लगावला. त्यानंतर आता मनसेनेही जोरदार हल्लाबोल केला. 

वेगवेगळ्या नावाने निवडणुका लढणाऱ्या दिपाली सय्यद यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला मनसेचे गजानन काळे आणि अखिल चित्रे यांनी लगावला होता. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिपाली सय्यद यांनी माझं नाव लग्नापासून, गेल्या 25 वर्षांपासून दिपाली सय्यदच असल्याचं म्हटलं आहे. मी कधीच निवडणूक लढले नाही. लग्नापासून मी आजही त्यांच्यासोबतच आहे, माझा संसारही चालू आहे. म्हणून, मी दुसऱ्या कुठल्याही नावाने निवडणूक लढत नाही. माझं आधार कार्डसुद्धा दिपाली सय्यद नावानेच आहे, असे स्पष्टीकरण दिपाली सय्यद यांनी दिले. 

शिवसेना नेता हे पद माझ्याकडे

कोणं म्हणतं माझ्याकडे पद नाही. माझ्याकडे शिवसेना नेता हे पद आहे. मी कुठेही जाते तिथं मला शिवसेना नेत्या म्हणूनच ओळखलं जातं, असे म्हणत दिपाली सय्यद यांनी माझ्याकडे विशेष कुठलं पद नसलं तरी, शिवसेना नेता हे पद आहे, असे त्यांनी म्हटलं. 

शालिनी ठाकरेंनी साधला होता निशाणा

"राजसाहेबांना, मनसेला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा..." असं म्हणत निशाणा साधला आहे. शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "राजसाहेबांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा 'मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या' असा अग्रलेख लिहिणाऱ्या 'सामना'वीरांचा अग्रलेख वाचा. मग तुमच्यातील 'सय्यद' अचानक 'बंड' करेल किंबहुना त्याने तसं करायलाच हवं!" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेनाअयोध्या