दीपांकर दत्ता यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:53 AM2020-04-29T05:53:55+5:302020-04-29T05:54:14+5:30

राजभवन येथे निवडक लोकांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दत्ता यांना पदाची शपथ दिली.

Dipankar Dutta was sworn in as the Chief Justice of the Mumbai High Court | दीपांकर दत्ता यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ

दीपांकर दत्ता यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ

googlenewsNext

मुंबई : कोलकाता उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे निवडक लोकांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दत्ता यांना पदाची शपथ दिली.
राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी न्या. दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखविली. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना शपथ दिली. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्यात आले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, न्या. दत्ता यांचे कुटुंबीय, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
दत्ता यांनी १६ नोव्हेंबर १९८९ रोजी वकिलीला सुरुवात केली. त्यांनी कोलकाता उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय, झारखंड उच्च न्यायालय तसेच काही वेळा सर्वोच्च न्यायालयात एकूण १६ वर्षे सेवा बजावताना दिवाणी, घटनात्मक, कामगार, सेवा, शिक्षण व वाहतूक विषयक प्रकरणे हाताळली. घटनात्मक वाद आणि दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. २२ जून २००६ रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये त्यांची कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचा कार्यकाळ २७ एप्रिल २०२० रोजी संपला, या पार्श्वभूमीवर न्या. दीपांकर दत्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Dipankar Dutta was sworn in as the Chief Justice of the Mumbai High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.