विनामास्क फिरणाऱ्या तरुणावर थेट गुन्हा दाखल; अशाप्रकारची मुंबईतील पहिली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 08:20 PM2020-10-14T20:20:49+5:302020-10-14T20:21:14+5:30
सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क न लावणाऱ्या लोकांकडून दोनशे रुपये दंड वसूल केला जातो.
मुंबई: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र मास्कचा वापर होणे आवश्यक आहे. मात्र समज देऊन व दंड ठोठावूनही अनेक ठिकाणी नागरिक विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. तसेच बुधवारपासून दंडाबरोबरच पोलिसांमार्फतही कारवाईला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत पहिला गुन्हा गोवंडी येथील तरुणावर दाखल झाला आहे.
सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क न लावणाऱ्या लोकांकडून दोनशे रुपये दंड वसूल केला जातो. गेल्या सहा महिन्यांत विनामास्क फिरणाऱ्या ४० हजार लोकांकडून एक कोटी पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. २४ विभागांमध्ये नियुक्त संस्थांचे प्रतिनिधी व पालिका कर्मचारी यांच्याद्वारे ही कारवाई नियमित सुरु आहे. त्याचबरोबर पोलिस दल व वाहतूक पोलिस यांच्यासमवेत विभागस्तरावर ‘संयुक्त कारवाई आराखडा’ तयार करण्यात येत आहे.
अशा कारवाईनंतरही लोकांमध्ये सुधारणा दिसून न आल्यास दंडाची रक्कम दोनशे रुपयांवरून चारशे रुपये करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. त्याचबरोबर मास्क न लावणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. गोवंडी येथील २९ वर्षीय तरुणाने सार्वजनिक ठिकाणी फिरताना तोंडाला मास्क न लावल्याने त्याच्यावर कलम १८८ अंतर्गत एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे.
- दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, प्रभात फेरीला जाणारे नागरिक ‘विनामास्क’ आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
- मास्क न लावणाऱ्यांना टॅक्सी, बस, कार्यालय, आस्थापना, सोसायटी अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारण्याचा नियम महापालिकेने यापूर्वीच केला आहे.
- ९ एप्रिलपासून विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर पालिकेने कारवाई सुरू केली. कोरोनावर प्रभावी ठरणारी लस बाजारात येईपर्यंत मास्क लावणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
- विनामास्क फिरणाऱ्या दररोज २० हजार लोकांना दंड करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.