वीज बिल तक्रारदारांशी आता थेट संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 02:16 PM2020-07-24T14:16:15+5:302020-07-24T14:16:55+5:30
वाढत्या वीज बिलांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
मुंबई : वाढत्या वीज बिलांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वीज बिले वाढीव येत असून वीज ग्राहक हैराण झाले आहेत. परिणामी यावर एक छोटा उपाय म्हणून आता वीज बिल तक्रारदारांशी थेट संवाद साधला जात आहे. आणि यातून वीज ग्राहकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेली अनेक दिवस मराठी भारती संघटना वाढीव वीज बिल विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन उभे करत आहे. नुकतेच वीज बिल केंद्रावर जाऊन मराठी भारतीच्या अध्यक्ष पूजा बडेकर ह्यांच्या सोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकांशी थेट संवाद साधला. तसेच कार्यवाह विजेता भोनकर आणि आशिष गायकवाड ह्यांनी ही मोहीम राबवली. अनेक वृद्ध नागरिक या रांगेत तक्रार घेऊन उभे होते. जिथे महिन्याला पाचशे रुपये बिल येत होते. तिथे महिन्याला १५०० ते २००० रुपये वीज बिल आले आहे. त्यात १ एप्रिल २०२० पासून सरकारने वीज बिलात वाढ केलेली आहे. मराठी भारती संघटना लोकांशी थेट संवाद सप्ताह हा उपक्रम सुरू ठेवणार आहे. या अंतर्गत दररोज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीज बिल केंद्रांवर जाऊन लोकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेणार असल्याची माहिती संघटक राकेश सुतार यांनी दिली.
लॉकडाउनमुळे होरपळलेल्या सामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा शॉक राज्य सरकारने दिलेला आहे. या विरोधात मोहीम तीव्र करत नागरिकांना या दरवाढी विरोधात संघटित करून राज्य सरकार तसेच वीज नियामक मंडळापर्यंत त्यांच्या तक्रारी पोहचवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने वीज दरवाढीच्या विरोधात राज्यभरात हिसाब दो मोहीम हाती घेण्यात आली आहे. वेबसाईटच्या माध्यमातून वीज नियामक मंडळाला वाढीव विजबिलांबाबत आता नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार आहे. तसेच या माध्यमातून नागरिकांना दिल्ली व महाराष्ट्राच्या विजबिलांमधील तफावत देखील समजून येणार आहे.