महावितरण अध्यक्षांचा तंत्रज्ञांशी थेट संवाद
By admin | Published: April 19, 2017 01:00 AM2017-04-19T01:00:43+5:302017-04-19T01:00:43+5:30
महावितरणचे दैनंदिन कामकाज अधिक गतिशील, पारदर्शी व परिणामककारक बनविण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार
मुंबई : महावितरणचे दैनंदिन कामकाज अधिक गतिशील, पारदर्शी व परिणामककारक बनविण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी मंगळवारी राज्यभरातील तंत्रज्ञांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. या तंत्रज्ञांकडून पात्र सूचनांच्या आधारावर त्यांनी ग्राहकसेवेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश देत हयगय करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला.
तंत्रज्ञांशी थेट संवाद साधणारे संजीव कुमार हे महावितरणचे पहिलेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. महावितरणमधील सर्व १६ परिमंडलांतील मुख्य अभियंत्यांसोबत त्यांनी संवाद साधला. या वेळी केवळ मुख्य अभियंत्यांसोबत संवाद न साधता तंत्रज्ञ, जनित्र आॅपरेटर, कर्मचारी यांचेही मत त्यांनी ऐकून घेतले. सर्व ग्राहकांचे मीटरवाचन हे प्रत्येक महिन्यात वेळेत व्हायला हवे. तसेच प्रत्येक ग्राहकाला त्याचे वीजबिल हे वेळेत जायलाच हवे. विजेसंबंधीची महत्त्वाची कामे ही कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने करावीत व नियोजनपूर्वक देखभालीची ठरविलेली कामे ही ग्राहकांना पूर्वसूचना देऊन करावीत, यावर संजीव कुमार यांनी भर दिला.
फोटो मीटर रिडिंग, मीटरचे छायाचित्र, फिडर व डीटीसी मीटर रिडिंग, नवीन वीज जोडणी, वीजबिल भरणा व इतर दैनंदिन कामे ही मोबाइल अॅप्सद्वारेच करण्यात यावीत. कामे करण्यास हयगय केल्यास कारवाईचे निर्देश संजीव कुमार यांनी दिले. ग्रामीण भागातील ग्राहकांना दिला जाणारा एसएमएस मराठीतून देण्यात यावा, असेही या वेळी त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)