Join us

दक्षिण मुंबईतून थेट नवी मुंबई, फक्त २० मिनिटांत; मुंबई ट्रान्स हार्बर लिंक २०२३ला खुला होणार

By सचिन लुंगसे | Published: August 02, 2022 6:44 PM

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला शिवडी न्हावा शेवा प्रकल्प असेदेखील म्हणतात.

- सचिन लुंगसे

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारा राबविण्यात येत असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम आजघडीला ८० टक्के पूर्ण झाले असून, हा प्रकल्प डिसेंबर २०२३ दरम्यान मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. तसे नियोजनच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई ही नवी मुंबईशी जोडली जाईल. या प्रकल्पामुळे सध्याच्या १२० मिनिटांच्या प्रवासाच्या तुलनेत केवळ २० मिनिटांत हे अंतर पार करणे शक्य होणार आहे.

काय होणार?

  • नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा विकास होणार
  • मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार
  • प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार
  • मुंबई व नवी मुंबई आणि कोकण यामधील अंतर कमी होणार
  • इंधन व वाहतूक खर्चात बचत होणार

८०% शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण-

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला शिवडी न्हावा शेवा प्रकल्प असेदेखील म्हणतात. प्रकल्पामध्ये मुंबईतील शिवडी, मुंबई खाडीवरील शिवाजीनगर आणि चिर्ले, नवी मुंबई येथे जवळच इंटरचेंज आहेत. २२  किमी लांबीचा, समुद्रावर सुमारे १६.५ किमी लांबीचा आणि दोन्ही बाजूला जमिनीवर सुमारे ५.५ किमी लांबीचा ६ मार्गिका असलेल्या पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. प्रकल्पाचे काम मार्च २०१८ पासून सुरू आहे.

कसा होता प्लॅन?

मुंबई येथील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचा प्रस्ताव ३० वर्षांपूर्वीपासून विचाराधीन होता. मुंबई व नवी मुंबई यामधील वाहतूक वेगवान व्हावी, या हेतूने मुंबई बेटावरील शिवडी ते मुख्य भूमी (नवी मुंबई) वरील न्हावा या दरम्यान पूल बांधण्याचा विचार करण्यात आला होता.

पॅकेज एक : ० ते १०.३८० किमीपॅकेज दोन : १०.३८० ते १८.१८७ किमीपॅकेज तीन :  १८.१८७ ते २१.८०० किमीपॅकेज चार : इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीमइंटरचेंज : मुंबईच्या बाजूने शिवडी आणि नवी मुंबईच्या बाजूने शिवाजीनगर व चिर्लेपॅकेज एक : एल अँड टीपॅकेज दोन : डीएईडब्ल्यूओओई अँड सी - टाटा प्रकल्प जेव्हीपॅकेज तीन : एल अँड टी

प्रकल्पामध्ये काय आहे?

मुंबईतील शिवडी, मुंबई खाडीवरील शिवाजीनगर आणि चिर्ले, नवी मुंबई येथे जवळ इंटरचेंज आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामध्ये पोचमार्ग, इंटरचेंज, इंटेलिजन्स ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि सागरी सेतूसाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधा असतील.

मुंबईकरांना खूशखबर डिसेंबर २०२३ मध्ये खुला होणार-

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (शिवडी - न्हावा शेवा पूल) हा २१.८ किलोमीटर आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना हा रस्ता जोडणारा आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर देशातील सर्वात लांब पूल, अशी त्याची ओळख असणार आहे. शिवडी येथून हा पूल सुरू होत आहे. एलिफंटा बेटाच्या उत्तरेकडील ठाणे खाडीला पार करत न्हावा शेवा येथील चिर्ले गावात उतरणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर ६ मार्गिका असतील. याद्वारे नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी पोर्ट, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा महामार्गाकडे आगेकूच करता येईल.

टॅग्स :रस्ते वाहतूकमुंबईनवी मुंबईवाहतूक कोंडी