Join us

दोन महिन्यांमध्ये देणार खेळाडूंना थेट सरकारी नोकरी; क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 6:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत शुक्रवारी दिली.

ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, रोइंगपटू दत्तू भोकनळ आणि आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके यांना शासनसेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

 महाजन म्हणाले की, २०१८ मध्ये खेळाडूंना शासनसेवेत नियुक्ती देण्याबाबतचे सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा आढावा घेण्यासाठी शासनामार्फत समिती नेमण्यात आली असून, या समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. या अहवालाचा अभ्यास करून सुधारित क्रीडाधोरणानुसार गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. 

अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाच्या गट अ ते गट ड मधील पदांवर थेट नियुक्तीसाठी क्रीडा अर्हताही निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय दिव्यांग खेळाडूंचीही गट अ ते गट ड मधील पदांवरील क्रीडाप्रावीण्य अर्हता निश्चित करण्यात आली असून, या निकषांआधारे आतापर्यंत ६७ खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती देण्यात आली आहे.

याशिवाय गुणवत्ताधारक खेळाडूंच्या सेवा घेऊन गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने खेळाडूंच्या थेट नियुक्तीच्या धोरणात सुधारणा करण्यात येत आहे, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :गिरीश महाजनविधानसभा