Join us

एसटी चालक, वाहकांचा प्रवासी नियोजनात थेट सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:06 AM

मुंबई : एसटी प्रवासी वाहतूक नियोजनात आता एसटीच्या चालक, वाहकांचा थेट सहभाग असणार आहे. एसटी महामंडळाने आगार पातळीवर चालक, ...

मुंबई : एसटी प्रवासी वाहतूक नियोजनात आता एसटीच्या चालक, वाहकांचा थेट सहभाग असणार आहे. एसटी महामंडळाने आगार पातळीवर चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक यांना प्रवासीभिमुख वाहतुकीच्या नियोजनासाठी आपल्या सूचना लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन केले आहे.

सध्या एसटी महामंडळामध्ये ३७ हजार चालक व ३७ हजार वाहक कार्यरत आहेत. चालक, वाहकांना एसटीच्या प्रवासी वाहतुकीसंदर्भात नवीन वेळापत्रक तयार करणे, नवीन बस मार्ग सुरू करणे, सध्या सुरू असलेल्या मार्गांमध्ये प्रवासी मागणीनुसार बदल करणे, मार्गावरील थांब्याची संख्या निश्चित करणे, विशिष्ट मार्गासाठी विशिष्ट वाहनांचा प्रकार अवलंबणे यासारख्या उत्पन्न वाढीच्या नियोजनामध्ये आपल्या सूचना देता येणार आहेत.

एसटी महामंडळामध्ये चालक, वाहक हे प्रमुख घटक आहेत. एसटीच्या सर्व बस फेऱ्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यामार्फत केली जाते. चालक, वाहक एसटीच्या माध्यमातून रस्त्यावर प्रवास करीत असतात. साहजिकच प्रवाशांचा सततचा संपर्क यामुळे विविध बस फेऱ्या सुरू करणे, त्यावरील थांबे निश्चित करणे, कोणत्या प्रकारची बस वापरावी याबद्दल माहिती देणे अशा उत्पन्न वाढीच्या अनेक सूचना चालक, वाहक आपल्या एसटी प्रशासनाकडे करीत असतात. परंतु, त्यांची दखल घेतली जातेच असे नाही. परंतु, या वेळेला महामंडळाने एक परिपत्रक काढून प्रवासी वाहतुकीच्या नियोजनात चालक, वाहकांच्या सूचना तक्रारी लेखी स्वरूपात नोंदवून त्यांचा सहभाग वाढविण्याची योजना आखली आहे. यापूर्वी गेले अनेक वर्षे विभागीय स्तरावर काही मोजक्या अधिकाऱ्यांमार्फत प्रवासी वाहतुकीचे नियोजन केले जात असे. परंतु, अनुभवाअभावी या नियोजनातून अपेक्षित प्रवासी संख्येमध्ये वाढ होत नाही हे महामंडळाच्या लक्षात आले. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणाऱ्या चालक, वाहकांना सहभागी करून घेण्याचा एक चांगला उपक्रम महामंडळाने राबविला आहे. विशेष म्हणजे आगार पातळीवर लेखी स्वरूपात दिल्या जाणाऱ्या या सूचनांचे योग्य नोंद ठेवली जाणार असून, त्या आधारे वेळापत्रक निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे चालक वाहकांनी दिलेल्या सूचनांची पोहोच पत्राद्वारे आगार प्रशासनाने त्यांना द्यावयाची आहे.

-----------------------

प्रवासी वाहतूक नियोजन चालक, वाहकांच्या सूचना विचारात घेतल्यास एसटी महामंडळाला प्रवासी व उत्पन्न वाढीसाठी निश्चित फायदा होईल. अशा सर्वसमावेशक उपक्रमांचे आम्ही स्वागतच करतो.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस