मुंबई - भारतात विमान सेवेची नऊ वर्ष पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर विस्तारा विमान कंपनीने मुंबई ते पॅरिस अशा थेट विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या २८ मार्चपासून या सेवेची सुरुवात होणार आहे.
आठवड्यातून पाच वेळा कंपनीच्या ताफ्यातील बोईंग ७८७-९ हे विमान मुंबईतून पॅरिससाठी झेपावणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार अशा पाच दिवशी हे विमान मुंबईतून भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजून पाच मिनिटांनी उड्डाण करेल. तर पॅरिसहून मुंबईसाठी तेथील स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजून १० मिनिटांनी उड्डाण करेल. सध्या कंपनीची दिल्ली ते पॅरिस अशी थेट सेवा आठवड्यातून पाच वेळा सुरू आहे. त्यानंतर आता देशाच्या आर्थिक राजधानीतून पॅरिससाठी ही सेवा सुरू होणार आहे. अलीकडेच कंपनीने मुंबईतून लंडन व फ्रँकफर्टकरिता थेट सेवा सुरू केली आहे.