Join us  

फडणवीसांची सही कॉपी करून थेट बदलीचे आदेश! विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचा ईमेल हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 5:25 AM

सायबर विभागाने मोहम्मद इलियास याकूब मोमीन (४०) याला मिरजमधून अटक केली आहे.

मुंबई : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा ई-मेल हॅक करत महावितरण अधिकाऱ्यांचे बनावट बदली आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार राज्य सायबर विभागाच्या कारवाईत समोर आला. सायबर विभागाने मोहम्मद इलियास याकूब मोमीन (४०) याला मिरजमधून अटक केली आहे.

मूळचा मिरजचा असलेला इलियास हा बीई इलेक्ट्रिकल इंजिनीअर असल्याने त्याने हे कृत्य एकट्याने केले असावे, असा अंदाज आहे. तो खासगी कंत्राटदार म्हणून काम करतो. आरोपीने अधिकाऱ्यांशी आधी पैशांचा व्यवहार केल्याचा संशय असून त्यानुसार, सायबर विभाग तपास करत आहे. फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या नावाचा गैरवापर करून ईमेल आयडी हॅक करून बनावट आदेश काढल्याची माहिती समोर आली. याबाबत महाले यांनी तक्रार नोंदविताच राज्य सायबर विभागाने तपास सुरू केला. राज्य सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.

आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने बनावट पद्धतीने काढलेल्या बदली आदेशावर गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही कॉपी पेस्ट केल्याचेही समोर आले.

  तांत्रिक तपासात मिरज कनेक्शन निघताच पथकाने आरोपीला मिरजमधून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ अधिकाऱ्यांचे बनावट आदेश काढण्यात आले होते.

  विद्याधर महाले यांचा ईमेल आयडी हॅक करून बदलीसंदर्भात सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर आदेश काढल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी बनावट आदेशांमार्फत पैसे उकळत होता.

या अधिकाऱ्यांचे बनावट आदेश...

गणेश मुरलीधर असमर (उपकार्यकारी अभियंता), दुर्गेश जगताप (सहायक अभियंता), मनीष धोटे (सहायक अभियंता), यशवंत गायकवाड (सहायक अभियंता), ज्ञानोबा राठोड (सहायक अभियंता) आणि योगेश आहेर (सहायक अभियंता) या सहा जणांच्या आदेशाचा यात समावेश आहे. या अधिकाऱ्यांची देखील सायबर विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे.