- रामदास फुटाणे,देशातील इतर राज्यांना भूगोल आहे; पण महाराष्ट्राला इतिहास आहे, असं म्हटलं जातं. महाराष्ट्र हा त्या अर्थाने देशाचं एक सांस्कृतिक केंद्र आहे. ज्ञानेश्वर माउली, नामदेव व तुकाराम महाराज या संतांच्या परिस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. विविध कलांच्या समृद्ध परंपरेतून महाराष्ट्राला सांस्कृतिक परिमाण लाभले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया याच भूमीत रचला गेला. दादासाहेब फाळके यांनी चित्रपटाची मूहुर्तमेढ रोवली आणि बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर या मनस्वी मंडळींमुळे भारतीय सिनेमाची वाटचाल सुकर झाली. शिल्पकलेचा विचार केला तर अजंठा, एलोरासारख्या शिल्पांचा खजिना असलेली ठिकाणं इथे आहेत. राम सुतार ते उत्तम पाचरणे यांच्यापर्यंत हा एक मोठा कलाप्रवास आहे. चित्रकलेमध्ये एस. एन. पंडित, बाबूराव पेंटर, माधवराव सातावळेकर, एम. एफ. हुसैन, वासुदेव कामत यांची नावे घेतल्याशिवाय कलाप्रवास पूर्ण होणार नाही. कोणत्याही राज्याच्या विकासाचे मूल्यमापन करायचे झाल्यास ते निव्वळ सामाजिक वा आर्थिक निकषांवर होत नाही. तर त्या राज्याची संस्कृती कशी आहे, यावरही ते ठरते. हीच बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कला संस्कृतीला महत्त्व देऊन त्या दृष्टीने विकासासाठी स्वतंत्र खाते विकसित केले आणि यशवंतरावांच्या दूरदृष्टीमुळे व व्यासंगामुळे आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण झाली. असा विकास साधणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य.शासकीय अंदाजपत्रकात सांस्कृतिक कार्य विभागासाठी विशेष आर्थिक तरतूद नव्हती. ती परंपरा महाराष्ट्राने सुरू केली. त्यामुळेच साहित्यासह शिल्पकला, चित्रकला, संगीत, रंगभूमी अशा कला बहरत गेल्या. विविध नाट्यस्पर्धांमधून कलावंत पुढे येऊ शकले. चित्रपटांना देण्यात येणाऱ्या अनुदानामुळे मराठी चित्रपट निर्मितीची संख्या वाढली. आज हिंदी चित्रपटांच्या तुलनेत तंत्रज्ञानासह लोकप्रियतेच्या बाबतीत मराठी चित्रपट मागे नाहीत. महेश मांजरेकर, रवी जाधव, नागराज मंजुळे यांसारख्या प्रतिभावान दिग्दर्शकांनी वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आणि प्रेक्षकांची अभिरूची वाढवली. गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाचा आलेख उंचावत राहिला आहे; परंतु आगामी काळात महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात कायम आघाडीवरच राहील, हे म्हणणं धाडसाचं आहे.महाराष्ट्राने आजवर कलाविश्वाला चांगले दिग्दर्शक, संगीतकार, गायक, शिल्पकार, चित्रकार, प्रगल्भ अभिनेते, अभिनेत्री, कवी, लेखक, नाटककार दिले. या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असण्यासाठी सांस्कृतिक धोरण असले पाहिजे; मात्र दुर्दैवाने याचा विचार राज्यकर्त्यांकडून होताना दिसत नाही. सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याची यशवंतरावांनी घालून दिलेली परंपरा वसंतराव नाईक, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांनी पुढे चालवली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ज्यांना सांस्कृतिक खात्यात काडीमात्र रस नाही, तेच या खात्याचे मंत्री होताना दिसत आहेत. त्यांच्या दुर्लक्षतेमुळेच महाराष्ट्र सांस्कृतिक विभागापासून विभक्त होत चालला आहे. कला आणि क्रीडा या मनुष्याच्या समृद्ध जीवनाच्या गरजा आहेत. त्या गरजांची पूर्तता करणे हे काम आहे. आपल्याला परदेशातल्या कलावंतांचे कौतुक करण्याची हौस असते. मराठी कलाकारांकडे आपलेच समीक्षक ढुंकून पाहत नाहीत. शिल्पकार राम सुतार यांचा ‘धान्यस्थ गांधी’ हा प्रयोग जगात गाजला; परंतु महाराष्ट्रातल्या कितीजणांना तो माहिती आहे? शालेय अभ्यासक्रमात त्यांचे नाव नाही. ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार यांनी हा कलात्मक वारसा जपला आहे; परंतु त्यांना कलाशिक्षणात स्थान नसणे ही शोकांतिका आहे.(शब्दांकन : नम्रता फडणीस)(ज्येष्ठ वात्रटिकाकार)
सांस्कृतिक महाराष्ट्राची दिशा अन् दुर्दशा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 1:34 AM