मुंबई : दरवर्षी जानेवारीत होणारे अॅन्ट्रप्रोनरशिप-समिट (ई-समीट) म्हणजे आयआयटी मुंबईच्या ई-सेलचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. यंदा १९ आणि २० जानेवारी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी उद्योग जगतातील प्रसिद्ध उद्योजक, विशेष कार्यकारी अधिकारी, संस्थापक आदी दिग्गजांनी हजेरी लावत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये उद्योजकतेच्या संस्कृतीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू झालेले हे ई-समिट होतकरूंसाठी दिशादर्शक, उपयुक्त ठरत असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.‘समस्यांपासून पळू नका, तर त्यांच्या प्रेमात पडा’ असा सल्ला यावेळी देशपांडे फाउंडेशनचे सहसंस्थापक गुरुराज देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. इंडियन-अमेरिकन व्हेंचर कॅपिटॅलिस्ट असलेले गुरुराज यांनी भारताला अधिकाधिक उद्योजकांची गरज का आहे, ते समजावून सांगितले. समस्यांकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन कसा अवगत करावा आणि त्या कशा सोडवाव्यात, याचा गुरुमंत्र त्यांनी दिला. लहान पावलांनी मोठ्या स्वप्नांकडे कशी झेप घ्यायची हेदेखील सांगितले. आपण आपल्या क्षेत्रात नेहमी अग्रेसर असायला हवे, असे मत पीडिलाइट इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मधुकर पारेख यांनी व्यक्त केले. उद्योग जगतात बौद्धिक नम्रता किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देताना आपल्या क्षेत्रातील अनेक गोष्टी आपण समजावून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.या समिटमधील इंटर्नशिप आणि जॉब फेअर भारतीय विद्यार्थ्यांमधील उत्तमोत्तम टॅलेंट कंपन्यांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे व्यासपीठ आहे. मॉंक या स्टार्टअप कंपनीसाठी फक्त एका तासात १२ विद्यार्थी तर मनीटॅप कंपनीला २५ हून अधिक विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी भेट दिल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळविण्यासाठी आणि चर्चा सत्रांमधून बरेच काही शिकण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याची प्रतिक्रिया बीटेकच्या तृतीय वर्षाला असलेल्या एका विद्यार्थ्याने दिली.वॉल्ट डिस्नेचे भारतातील प्रमुख अभिषेक महेश्वरी यांनी मार्वल कथा आणि त्यांची पार्श्वभूमी यांची माहिती सांगितली. सोबतच वॉल्ट डिस्नेच्या सुंदर चित्रफिती विद्यार्थ्यांसाठी या वेळी सादर करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसात चर्चा सत्रे, स्पर्धा, कार्यशाळा, स्टार्टअप एक्सपोच्या माध्यमातून प्रेरणा आणि अनुभवांचा खजिना विद्यार्थ्यांसह उपस्थितांसाठी खुला करण्यात आला. ई-समिटचा रविवारचा दिवसही तरुण, विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि अनुभवात भर टाकणारा, प्रेरणादायी, मार्गदर्शक असेल, अशी अपेक्षा ई-सेलकडून व्यक्त करण्यात आली. या समितीसाठी ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांसाठी समीट ठरले दिशादर्शक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 6:12 AM