- संदीप शिंदेमुंबई : मुंबई महानगर प्रदेशात विस्तारणाऱ्या मेट्रोचे जाळे अधिकाधिक प्रभावी ठरावे आणि परंपरागत वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करून प्रवास जास्तीतजास्त सुसह्य व्हावा यासाठी एमएमआरडीएने मेट्रो स्थानकांना जोडणारा स्वतंत्र मार्ग (पादचारी पूल) उभारणीचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मेट्रो मार्गिकेलगतच्या मॉल आणि व्यावसायिक आस्थापनाच नव्हे, तर मोठ्या गृहसंकुलांनाही थेट मेट्रो स्थानकात प्रवेश देण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.मुंबई महानगर प्रदेशात २०३१ सालापर्यंत ३३७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांचे जाळे विस्तारले जाईल. परंपरागत वाहतूक व्यवस्थेवरील ताण ८६ टक्के, इंधनाचा वापर ३० टक्के तर प्रदूषण ५८ टक्क्यांनी कमी करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रयत्नांपैकी थेट जोडणी मार्गांचा एक पर्याय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) विचाराधीन आहे. या प्रस्तावाबाबत बांधकाम व्यावसायिकांचे मतही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतले आहे. यातून एमएमआरडीएला उत्पन्नाचे पर्यायी स्रोतही उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.मेट्रो स्थानकालगतच्या बांधकामांचे विकासक असे जोडणी मार्ग करण्यास इच्छुक असतील तर त्यांना त्याबाबतचा विस्तृत प्रस्ताव प्राधिकरणाकडे सादर करावा लागेल. व्यवहार्यता आणि तांत्रिक उपयुक्तता तपासून मंजुरी देण्याचे अधिकार महानगर आयुक्तांना असतील. मार्गिका उभारणीचा संपूर्ण खर्च विकासकांना करावा लागेल. मेट्रो प्रवाशांच्या फायद्यासाठी प्रवेश मार्ग, जिना किंवा अन्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा हक्क प्राधिकरणाला असेल.ही मार्गिका सार्वजनिक वापरासाठी खुली असेल. तिचे संचलन आणि देखभालीचे काम मुंबई मेट्रो संचलन महामंडळ (एमएमएमओसीएल) करेल. तेथील संभाव्य व्यावसायिक विकास आणि वापराचे तसेच आर्थिक स्रोतांमधून मिळणा-या उत्पन्नावर महामंडळाचाच अधिकार असेल. प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत यावर चर्चा अपेक्षित असून त्यानंतर अंतिम मसुदा निश्चित केला जाईल.रस्त्यांवरील ताण होणार कमीउन्नत पादचारी मार्गिकांच्या माध्यमातून मेट्रो स्थानक ते मार्गिकेलगतच्या बांधकामांना जोडण्याची परवानगी विकासकांना दिली जाईल. स्थानकातील प्रवाशांनी त्या मर्गिकेवरून ये-जा केल्यास रस्त्यांवरील ताण कमी होईल.- आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
मॉल-सोसायटीतून थेट मेट्रो स्थानकात, एमएमआरडीएचे धोरण मंजुरीसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 2:29 AM