मुंबई :
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने, गणेशोत्सव मंडळांकडून तयारीची लगबग वाढली. गणेशोत्सव मंडळांनी देणगी गोळा करण्यासही सुरुवात केली आहे. काही ठिकाणी देणगीच्या बहाण्याने धमकावून, जबरदस्तीने वसुलीच्या घटना डोके वर काढत आहे. काही प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंत येतात; तर काही भीतीने पुढे येत नाहीत. कोणीही जबरदस्तीने वर्गणीची मागणी केल्यास थेट खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
साकीनाकामध्ये अशाच प्रकारे देणगीच्या नावाखाली वसुली करणाऱ्या मंडळाच्या तीन कार्यकर्त्यांना खंडणीच्या आरोपाखाली अटक केली आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तांनीही अशा मंडळांवर लक्ष ठेवण्याच्या आणि कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
साकीनाकामध्ये व्यावसायिक अन्साउल्ला चौधरी (वय ५४) यांना खैरानीचा सम्राट श्री गजानन मित्रमंडळासाठी पाच हजारांच्या देणगीची मागणी केली. चौधरी यांनी तेवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. काही दिवसांनी त्रिकुटाने त्यांना वाटेत अडवून पैशांची मागणी केली. त्यांचा नकार कायम राहिल्याने त्रिकुट अंगावर धावून गेले. अखेर, चौधरी यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा नोंदवत तिघांना अटक केली आहे.