जीएसटी घोटाळा: 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चा दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 12:46 PM2018-08-03T12:46:58+5:302018-08-03T12:48:54+5:30
विजय गुट्टेवर खोट्या इनव्हॉईसच्या आधारे घोटाळा केल्याचा आरोप आहे
मुंबई: 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटाचा दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टेला अटक करण्यात आली आहे. जीएसटी इंटेलिजन्सनं मुंबईतून गुट्टेला अटक केली आहे. त्याच्यावर 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. विजय गुट्टेविरोधात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या 132(1)(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय गुट्टेची मालकी असलेल्या वीआरजी डिजिटल कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं 34 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. चुकीच्या पद्धतीनं इनव्हॉईस वापरुन हा घोटाळा केल्याची माहिती मिळते आहे. गुट्टेच्या कंपनीनं ऍनिमेशन आणि मनुष्यबळासाठी दुसऱ्या कंपनीकडून (हॉरिजॉन आऊटसोर्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) 34 कोटी रुपयांचे खोटे इनव्हॉईस घेतले. विशेष म्हणजे हॉरिजॉन आऊटसोर्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर आधीच जीएसटीचा भरणा करताना 170 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुट्टेकडून सहकार्य केलं जात नाहीय. सध्या गुट्टे न्यायालयीन कोठडीत आहे. गुट्टेची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली असून त्याच्या कोठडीची मुदत 14 ऑगस्टला संपेल.
प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असेलला 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारु यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे. हंसल मेहता या चित्रपटाचे निर्माते आहेत.