मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संचालकपदी डॉ. बिवाश पांडव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिट्टू सहगल यांच्या अध्यक्षतेखालील बीएनएचएस पदाधिकारी व निसर्ग संरक्षक आणि वन्यजीव असणार्या बाह्य पॅनेलच्या मुलाखत समितीने गुरुवारी ही घोषणा केली आहे. डॉ. पांडव हे जीवशास्त्र आणि निसर्गात गेल्या ३० वर्षांपासून काम करत आहेत. वन्यजीव व्यवस्थापन, संरक्षित क्षेत्रे आणि समुदाय, मानव संसाधन विकास, रेडिओ-टेलीमेट्री आणि वन्य प्राण्यांचे स्थिरीकरण या क्षेत्रातील ते तज्ञ आहेत.सध्या डॉ. पांडव भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून येथील प्रजाती व्यवस्थापन विभागात प्राध्यापक आहेत. पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थ्यांना तसेच प्रशिक्षणार्थींना हर्पेटोलॉजी, मॅंग्रोव्ह इकोलॉजी, किनारपट्टीवरील पर्यावरणशास्त्र आणि वर्तणूक पर्यावरणशास्त्र इत्यादी विषय ते शिकवत आहेत. मार्च १९९४ साली ओडिशातील रुशिकुल्य नदीच्या मुख्यालगत असलेल्या समुद्री कासवाच्या घरट्याचा शोध घेणे हे डॉ. पांडव यांचे सर्वात मोठे योगदान आहे. ऑलिव्ह रिडले सी टर्टल लेपिडोचेलिस ऑलिव्हियाचा हा आता भारतातील सर्वात मोठा घरट्यासाठीचा समुद्रकिनारा आहे. ओडिशा किना-यावर समुद्री कासवांबद्दल डॉ. पांडव यांनी मोठे संशोधन केले आहे. समुद्री कासवांची दुर्दशा प्रकाशात आणण्यात हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले. भारतीय उपखंडातील वन्य वाघ, वन्यजीव आणि रानटी क्षेत्राच्या संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान आणि उत्तर-पश्चिममधील वाघ आणि शिकार प्रजातींच्या दीर्घकालीन संशोधन आणि देखरेखीसाठी त्यांना कार्ल झीस वन्यजीव संरक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.