सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालकपद चार महिन्यांपासून रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:40 AM2019-08-01T06:40:14+5:302019-08-01T06:40:20+5:30
अतिरिक्त खांद्यावर पदभार; विधानसभा निवडणुकीनंतरच नवी निवड होण्याची शक्यता
मुंबई : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक पद गेले चार महिने रिक्त आहे. सध्या संचालक पदाचा पदभार सहसंचालक मीनल जोगळेकर सांभाळत आहेत. गेली अनेक वर्षे संचालनालयाचे संचालकपद हे अतिरिक्त खांद्यावर आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये स्वाती काळे या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक पदी रुजू झाल्या. परंतु आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांशी त्यांचे पटत नसल्यामुळे अवघ्या आठ महिन्यांत त्यांना संचालक पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्या जाण्यानंतर सांस्कृतिक कार्य खात्याने अद्याप नवीन संचालकांचा शोध घेतलेला नाही.
नवीन संचालक आता थेट विधानसभा निवडणुकीनंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा लोककलावंतांसाठी राबविण्यात येणाºया योजनांचा बोजवारा उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रभारी संचालक पदाचा पदभार सध्या सह संचालक यांच्याकडे आहे. मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम वेळेत पूर्ण करणे हे सध्याच्या प्रभारी संचालकांच्या आवाक्याबाहेर आहे. परिणामी, सांस्कृतिक संचालनालयाकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष राज्याच्या सांस्कृतिक वैभवाला नुकसान पोहोचविणारे असल्याची चर्चा या विभागात आहे.
आमंत्रण पत्रिकेतील घोळ झाला उघड
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने साहित्यरत्न व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेवर पदांचा उल्लेख चुकला असून विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा सवाल उठविला जात आहे. या संचालनालयाच्या प्रभारी सहसंचालक मीनल जोगळेकर असून त्यांचा उल्लेख एका आमंत्रण पत्रिकेवर संचालक असा आहे, तर दुसºया पत्रिकेवर प्रभारी संचालक असा आहे. त्यामुळे हा पदांचा घोळ उघड झाल्याने तो चर्चेचा विषय ठरत आहे.