मुंबई : चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट आणि त्यांची मुलगी कृष्णा भट यांच्याविरोधात एका व्यावसायिकाने फसवणुकीचा आरोप केला आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार हे के सेरा सेरा कंपनीचे मालक असून अमोल देशमुख असे त्यांचे नाव आहे. त्यांनी भट यांच्यावर केलेल्या आरोपानुसार, १ मार्च २०२२ पासून आतापर्यंत विक्रम व कृष्णा यांनी कट करून एकत्रितपणे देशमुख यांच्या कंपनीसोबत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर देशमुख यांची के सेरा सेरा अँड विक्रम भट स्टुडिओ व्हर्चुअल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बनवली. त्यानंतर कंपनीच्या बँक खात्यावर देशमुख यांना १ कोटी ३९ लाख ३० हजार ९९९ इतकी रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडत त्याचा वापर वैयक्तिकपणे चित्रपटांसाठी केला. इतकेच नव्हे तर त्या प्रोजेक्टमधून त्यांना मिळालेली रक्कमदेखील देशमुख यांच्या कंपनीच्या खात्यात प्रयत्न करता त्यांचा विश्वासघात केला. या आर्थिक फसवणूकप्रकरणी विक्रम आणि कृष्णा यांच्या विरोधात देशमुख यांनी अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी याची पडताळणी करत बाप लेकीवर भारतीय दंड संहिता कलम ४२० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
दिग्दर्शक विक्रम भटवर फसवणुकीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:01 PM