नागरी संरक्षण संचालनालय देणार युवकांना रोजगाराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:38 AM2020-03-05T05:38:30+5:302020-03-05T05:38:37+5:30

सिव्हिल डिफेन्सकडून दरवर्षी २० विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. दीड वर्षापूर्वी विभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला गृह विभागाने आता मंजुरी दिली आहे.

The Directorate of Civil Defense will provide employment opportunities to the youth | नागरी संरक्षण संचालनालय देणार युवकांना रोजगाराची संधी

नागरी संरक्षण संचालनालय देणार युवकांना रोजगाराची संधी

Next

जमीर काझी 
मुंबई : सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे धडे देणारे नागरी संरक्षण संचालनालय (सिव्हिल डिफेन्स) आता होतकरू युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे. विभागाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापनाबाबत पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येईल. हा एक वर्ष कालावधीचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून तो सुरू होईल.
सिव्हिल डिफेन्सकडून दरवर्षी २० विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. दीड वर्षापूर्वी विभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला गृह विभागाने आता मंजुरी दिली आहे. या डिप्लोमामुळे युवकांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल.
भूकंप, महापूर, आग यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा घातपाती कृत्ये, दंगल आदी प्रसंगी दुर्घटनास्थळी पोलीस, बचाव पथक पोहोचेपर्यंत परिस्थितीशी सामना कसा करावा, स्वत:ची व नागरिकांची काळजी कशी घ्यावी, या प्राथमिक माहितीसाठी सिव्हिल डिफेन्स संचालनालय प्रशिक्षण देते. त्यासाठी त्यांच्या महाविद्यालयांत विविध अभ्यासक्रम, साधारण ६ दिवसांचे प्रशिक्षण मानसेवी तत्त्वावर काम करण्यासाठी तयार असलेल्या नागरिकांना दिले जाते. सध्याच्या वाढत्या दुर्घटनांच्या काळात कोणत्याही आस्थापनात आपत्ती व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संचालनालयाने युवकांना व्यापक स्वरूपात हे प्रशिक्षण दिल्यास नागरिकांची सुरक्षा आणि युवकांना भविष्यात नोकरीसाठी सक्षम पर्याय उपलब्ध होईल, हा या अभ्यासक्रमामागील हेतू आहे. हाच हेतू नजरेसमोर ठेवून विभागाचे महासमादेशक संजय पांडेय यांनी प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविला होता. त्यामध्ये डिप्लोमा अभ्यासक्रमाची रूपरेषा, त्यासाठी उपलब्ध क्षमता, येणारा खर्च आदींचे सविस्तर विवेचन करण्यात आले होते.
>दरवर्षी २० विद्यार्थ्यांना प्रवेश
या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून शुल्कापोटी ५९ हजार रुपये आकारण्यास मान्यता दिली आहे. कोणत्याही शाखेचे पदवीधर तरुण, तरुणी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतील.
>युवकांना होणार फायदा
आपत्ती व्यवस्थापनाची गरज सर्वांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे या विषयामध्ये एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध केल्याने युवकांना रोजगाराची संधी मिळेल. अभ्यासक्रमाची रूपरेषा निश्चिती करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली आहे.
- संजय पांडेय, महासमादेशक, नागरी संरक्षण संचालनालय

Web Title: The Directorate of Civil Defense will provide employment opportunities to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.