‘ते’ अनधिकृत अभ्यासक्रम बंद करण्याचे संचालनालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 02:28 AM2019-06-04T02:28:40+5:302019-06-04T02:28:49+5:30
अनधिकृत घोषित : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंटला नोटीस
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी बोगस संस्था आणि अभ्यासक्रम यांच्या जाहिरातींचा सुळसुळाट सर्वत्र दिसतो. या जाहिरातींना दरवर्षी हजारो विद्यार्थी बळी पडत असतात. राज्याच्या किंवा केंद्राच्या नियामक संस्थांची मान्यता नसतानाही बिनदिक्कत संस्था आपले अभ्यासक्रम चालवित आहेत. मुंबईतल्या अशाच अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंट या शैक्षणिक संस्थेविरोधात अखेर राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
सदर संस्थेला काही कोर्सेस तत्काळ बंद करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच पुणे येथील शाखेला प्रत्येकी एक लाख रुपये इतकी ‘शास्ती’ लावण्यात आली आहे. यासंबंधित ‘लोकमत’ने ४ मार्च, २०१९ रोजी वृत्त दिले होते़
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंट, अंधेरी ही शैक्षणिक संस्था यूजीसीच्या अनधिकृत/ बोगस विद्यापीठांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने थेट विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
त्यामध्ये या शैक्षणिक संस्थेच्या संचालकांना या संदर्भात पत्र दिले असून, ही संस्था तत्काळ बंद करावी आणि विद्यार्थ्यांची फसवणूक थांबविण्याचा इशारा दिला होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंटमधील एमबीए / पीजीडीएम (इव्हेंट मॅनेजमेंट) व डिप्लोमा (इव्हेंट मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांची मान्यता नसल्याची तक्रार संचालनालयाकडे प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनालयाच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आणि चौकशी करण्यात आली. सदर चौकशी समितीच्या अहवालावरून तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सुनावण्याही घेण्यात आल्या.
दरम्यान, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंटच्या मुंबई व पुणे यापैकी कोणत्याही शाखांकडून एआयसीटीई किंवा तत्सम कोणत्याही प्राधिकरणाची मान्यता असलेली कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे २०१३च्या महाराष्ट्र अधिनियमाच्या अनधिकृत संस्थांच्या नियमावलींचा आधार घेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंटमधील अनधिकृत कोर्सेस तत्काळ बंद करण्याचे निर्देश संचालनालयाकडून देण्यात आल्याची माहिती संचालक अभय वाघ यांनी दिली.
बोगस शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर किंवा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हातात पडलेल्या पदवी नामक कागदाच्या भेंडोळ्याला करिअरच्या बाजारात शून्य किंमत असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. तोपर्यंत पैसा, श्रम याच्याबरोबरीने तरुणांचा अमूल्य वेळ असे सर्व वाया गेलेले असते. विद्यार्थ्यांची संचालनालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे अनधिकृत अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांना चाप बसणार आहे़ त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचेल. -संतोष धोत्रे, मनविसे