मोलकरीण विनयभंगाप्रकरणी दिग्दर्शकाच्या पत्नीला अटक
By admin | Published: January 11, 2017 06:50 AM2017-01-11T06:50:17+5:302017-01-11T06:50:17+5:30
लहानसहान चुकांसाठी अल्पवयीन मोलकरणीला काठीने मारायचे, तिच्या गुप्तांगाला चिमटे काढत तिचा छळ करायचा
मुंबई : लहानसहान चुकांसाठी अल्पवयीन मोलकरणीला काठीने मारायचे, तिच्या गुप्तांगाला चिमटे काढत तिचा छळ करायचा, अशी निंदनीय घटना मंगळवारी मालाडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी अमृता कौर चावला (४०) हिला अटक केली असून, चित्रपट दिग्दर्शक देवेंद्रसिंह संधू यांची ती पत्नी आहे.
मालाड पश्चिमेकडील विशालनगर परिसरात संधू हे पत्नी, वडील आणि आठ वर्षीय मुलासोबत राहतात. मूळची आसामची राहणारी ही पीडित मुलगी २०१५ मध्ये तिच्या चुलत भावंडासोबत घरकामासाठी त्यांच्या घरी आली होती. महिना चार हजार पगारावर तिने काम करण्याचे ठरले.
सोमवारी रात्री ही मुलगी धावत पोलीस ठाण्यात आली. महिला पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा मालकिणीच्या घरातून मी पळून आलेय, असे तिने सांगितल्याचे बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. छोटीशी चूक झाली तरी तिची मालकीण तिला लोखंडी सळीने मारहाण करायची. तसेच गुप्तांगाला चिमटे काढायची, असेही तिने सांगितले. अखेर त्या घरातून मी पळून आले आणि रस्त्यावरील लोकांनी मला पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे सुचवले, असेही तिने पोलिसांना सांगितले. त्यानुसार चावलावर विनयभंग, मारहाण आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आहे. तिला दिंडोशी सत्र न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुलीला उपचारानंतर डोंगरी सुधारगृहात पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)