बस स्थानकावर स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगांना मिळेल रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 07:26 AM2023-11-23T07:26:20+5:302023-11-23T07:26:53+5:30

दिव्यांग, सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी सुविधा

Disabled people will get employment through a stall at the bus station | बस स्थानकावर स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगांना मिळेल रोजगार

बस स्थानकावर स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगांना मिळेल रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी बस स्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एसटी महामंडळाला दिले. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. बस स्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच, त्यांचा चेहरामोहरा बदलावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

एसटीच्या माध्यमातून नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी तयार २,२०० साध्या बस घेण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. 

 सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महामंडळाला २० नोव्हेंबरला ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. 

५,१५० ई-बसेस भाडेतत्त्वावर
राज्यातील एकूण बस स्थानकांपैकी १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच, मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बस स्थानकावर एक स्टॉल देण्याचे निर्देश दिले. एसटीतर्फे दोन वर्षांत ५,१५० ई-बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. या बससेवकरिता सामान्यांना परवडेल, असेच तिकीट दर ठेवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Web Title: Disabled people will get employment through a stall at the bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.