श्रीकांत जाधव
मुंबई : पहाटेच्या भर थंडीत पाण्याचे घसरलेले तापमान, फेसाळणाऱ्या जीवघेण्या समुद्री लाटा, जोराचा बोचरा वारा... अशा अनेक संकटांचा सामना करत प्रशिक्षकाने शिट्टीच्या आधारे दिलेल्या इशारावर एलिफंटा ते गेट ऑफ इंडिया हे सागरी १७ किलोमीटरचे अंतर केवळ ४ तास २ मिनिटांत पूर्ण करण्याचा विक्रम पूर्ण अंधत्व असलेल्या १४ वर्षीय दिव्यांग विद्यार्थिनी ईश्वरी कमलेश पांडे हिने शुक्रवारी केला. या विक्रमाची एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे.
शार्क अक्वायॉटिक स्पोर्टिंग असोसिएशनचे प्रशिक्षक संजय बाटवे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे, डॉ. ज्ञानेश ढाकुलकर यांच्या उपस्थित प्रेस क्लब येथे विक्रमवीर जलतरणपटू ईश्वरी कमलेश पांडे हिने माध्यमांशी संवाद साधला.
नागपूर येथे समुद्र नसल्याने तलावात सराव करणाऱ्या ईश्वरीला मुंबईचा गेट वे समुद्र नवखा होता. त्यामुळे नेमके कोणते अडथळे येथील याबाबत तिच्या मनात हुरहूर होती. डोळ्याने पूर्ण अंधत्व असल्याने समोर नेमकी काय स्थिती आहे. हे समजून घेणे ईश्वरीसाठी कठीण होते. अशात मुंबईत पहाटे अधिक थंडी असल्याने समुद्री पाणीही गारठले होते. त्यात मुंबईच्या दिशेने जोरात वाहणारे बोचरे वारे कानावर आदळत होते. पाण्यात तेल आणि इतर वस्तू अंगाला लागत होत्या. डोळ्यासमोर नुसता अंधार मात्र प्रशिक्षक संजय बाटवे यांनी शिकवलेले पाण्यातील स्ट्रोक आणि शिट्टीच्या आधारे एलिफंटा ते गेट ऑफ इंडिया हे सागरी १७ किलोमीटरचे अंतर केवळ ४ तास २ मिनिटांत पूर्ण करणे मला सहज शक्य झाले. या विक्रमामुळे मला अधिक मोठी कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे ईश्वरी पांडे हिने सांगितले.
तर ईश्वरी पांडे हिची जिद्द आणि विक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आदर्श उभा करणारी आहे. जलतरण खेळात नवा विक्रम यामुळे होणार आहे. केवळ जलपटूच नव्हेच प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला पोहता यायलाच हवे. त्याने नेहमी पोहण्याचा व्यायाम करावा. पोहण्याचा व्यायामाने कोणत्याही औषधी गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही असा सल्ला यानिमित्त्ताने प्रशिक्षक संजय बाटवे यांनी दिला आहे. -