मुंबई : टीवाय बीकॉमच्या प्रश्नपत्रिकांवरील वॉटरमार्कमुळे विद्यार्थ्यांना प्रश्न दिसणे कठीण झाले आहे. वडाळ्याच्या एका महाविद्यालयात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे या केंद्रावरील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठात तक्रार नोंदविली असून, अतिरिक्त गुण देण्याची मागणी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिकांचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून वॉटरमार्क पद्धत लागू करण्यात आली आहे. सध्या टीवाय बीकॉमची परीक्षा सुरू आहे. ५ एप्रिल रोजी रोजी टीवाय बीकॉमचा अकाउंटचा पेपर होता. तथापि, प्रश्नपत्रिकेवरील वॉटरमार्कमुळे बीजीपीएस महाविद्यालय वडाळा, हे केंद्र आलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न स्पष्ट दिसत नव्हता. यामुळे बराच वेळ वाया गेल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हे विद्यार्थी आर. एम. पोद्दार, एम.डी., शाहू महाविद्यालयाप्रमाणे दादर-परळ विभागातील आहेत. या प्रकरणात परीक्षा केंद्राकडे तक्रार करूनही कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्यांनी या प्रकरणी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्याकडे दाद मागितली आहे. वॉटरमार्क अति ठळक असल्याने विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी मागणी युवासेनेने केली. (प्रतिनिधी)
प्रश्नपत्रिकेवरील वॉटरमार्कमुळे गैरसोय
By admin | Published: April 18, 2017 5:21 AM