Join us

वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; लातूर-सोलापुरात मविआ उमेदवाराला बळकटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 2:22 PM

राज्याच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून महाविकास आघाडी आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट हे एकत्र आहेत

मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ऐन तिकीटवाटपावेळी स्थानिक नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या समोर येत आहेत. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सोबत नसल्याचे दाखवून देत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. वंचितच्या पहिल्या यादीत पूर्व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता. तर, दुसऱ्या ११ उमेदवारांच्या यादीत वंचितनं मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात, लातूरमधून नरसिंहराव उदगीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर, वंचितच्या लातूर जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर, सोलापुरातून माजी आमदार दिलीप माने यांनीही काँग्रेसचा हात हाती घेतला आहे.   

राज्याच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून महाविकास आघाडी आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट हे एकत्र आहेत. परंतु या तिघांमध्ये उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने बिनसले आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवारांच्या दोन यादी जाहीर केल्यामुळे तेही महाविकास आघाडीत सहभागी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचितने स्वत:चे उमेदवार दिल्याने आता काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसेल, असा अंदाज लावला जात आहे. मात्र, वंचितची यादी जाहीर होताच, वंचितचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदिश माळी यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर, सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनीही काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. नाना पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस पक्षात स्वागत केले. दरम्यान, या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रसेला बळ मिळालं असून लातूर व सोलापुरात पक्षाची ताकद वाढली आहे. 

दरम्यान, लातूरमध्ये काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे मैदानात आहेत, तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे, या दोन्ही पक्ष प्रवेशाचा फायदा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होणार आहे. 

यावेळी नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे तानाशाही सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी तसेच लोकशाही व्यवस्था व संविधान टिकवण्यासाठी हा लढा सुरु. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भिती दाखवून भाजपा दुसऱ्या पक्षातील लोकांना पक्षात प्रवेश देते. पण त्याचाही काही फरक पडत नाही. यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, दिलीप माने हे काँग्रेस पक्षाचेच होते पण मध्यंतरी इतर पक्षात गेले परंतु योग्यवेळ पाहून ते आज पुन्हा स्वगृही परतले आहेत. कार्यकर्त्यांशी चांगले संबंध असलेला नेता अशी त्यांची ओळख असून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात पक्षाला आणखी बळ मिळाले आहे. भाजपाकडून प्रणिती शिंदेंनाही ऑफर होती पण आम्ही काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, असा निर्वाळा सुशिलकुमार शिंदे यांनी दिला. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारीही देण्यात आली होती. या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. यानंतर त्यांना विधान परिषदेवरही पाठविण्यासाठी उमेदवारी देण्यात आली होती. आज अखेर माने यांनी शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  

टॅग्स :लातूरकाँग्रेससोलापूरलोकसभा निवडणूक २०२४