अपंगांच्या पदरी उपेक्षा
By admin | Published: December 3, 2014 02:36 AM2014-12-03T02:36:07+5:302014-12-03T02:36:07+5:30
मुंबई, ठाणे प्रमाणे नवी मुंबईमध्येही अपंग नागरिकांची उपेक्षा सुरूच आहे. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश करतानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे
नामदेव मोर, नवी मुंबई
मुंबई, ठाणे प्रमाणे नवी मुंबईमध्येही अपंग नागरिकांची उपेक्षा सुरूच आहे. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश करतानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. उद्यानांसह, स्काय वॉक तयार करतानाही प्रशासनास अपंगांचा विसर पडला आहे.
सुनियोजीत शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. परंतू शहराची निर्मीती करताना सिडकोसह महानगरपालिकेस अपंग नागरिकांचा विसर पडला आहे. वाशी ते बेलापूर पर्यंतच्या रेल्वे स्टेशनमध्ये अपंग नागरिकांना ये - जा करण्यासाठी सुविधा निर्माण केलेली नाही. भुयारी मार्ग व पादचारी पुलाच्या पायऱ्या चढताना व उतरताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नोकरी,व्यवसायानिमीत्त मुंबईत जाणाऱ्या काही नागरिकांना अक्षरश: उचलून स्टेशनमध्ये घेवून जावे लागत आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. अनेक नागरिक पायऱ्या चढताना पडून जखमी होत आहेत. किती दिवस ही गैरसोय सुरू राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रेल्वे स्टेशनप्रमाणे उद्यानामध्ये अपंगांसाठी पुरेशी सुविधा नाहीत. उद्यानामध्ये व्हिलचेअरवरबसून जाता येत नाही. चढ उतार करताना अडचण निर्माण होत आहे. काही उद्यानामध्ये सहजपणे सर्वांना जाता येईल अशी रचना आहे. परंतू सिवूड, नेरूळ, वाशी व इतर परिसरातील उद्यानामध्ये मात्र अद्याप अपंग नागरिकांना जाताना अडचण होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने ठाणे बेलापूर रोडवर खैरणे, रबाळे येथे स्काय वॉक तयार केला आहे. त्या ठिकाणी लिफ्टची सोय आहे. परंती लिफ्ट बंदच आहेत. यामुळे या स्काय वॉकचा वापर अपंग नागरिक करूच शकत नाहीत.