पनवेल : प्रवासी जास्त आणि तिकीट खिडक्या कमी असल्याने पनवेल आणि खांदेश्वर रेल्वेस्थानकावर तिकिटासाठी प्रवाशांच्या लांबच लाब रांगा लागत आहेत. किमान पाऊण ते एक तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, सुकापूर, देवद, विचुंबे, कळंबोली, कामोठे या परिसरात दररोज ८० ते ८५ हजार प्रवासी नोकरी - व्यवसायानिमित्त नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे या परिसरात जातात. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने त्याचा भार रेल्वेवर पडत चालला आहे. पनवेल ते सीएसटी, वडाळा रोड, वाशी, बेलापूर आणि ठाणे अशा दररोज २७२ फेऱ्या होतात. या सर्व भरून जात असून खांदेश्वर रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी आढळून येते. दैनंदिन तिकीट, मासिक पास काढणाऱ्याची संख्याही अधिक आहे याचे कारण म्हणजे जलद आणि स्वस्त प्रवास होय. पनवेल रेल्वेस्थानकावर सहा तिकीट खिडक्या असल्या तरी त्या सर्व एकाच वेळी सुरू नसतात. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे पनवेल रेल्वेस्थानकावर रिक्षा स्थानकापर्यंत रांगा येतात. काही कर्मचाऱ्यांना जलद तिकीट वितरीत करता येत नाही. अनेकदा खिडकीवर सुट्ट्या पैशांची अडचण येत असल्याने रांग पुढे सरकत नाही. कधी कधी उभे राहणे, नंबरवरून भांडणे आणि मारामाऱ्यासारखे प्रकारही घडत असल्याचे विशाल म्हात्रे या प्रवाशाने सांगितले. पावसाळ्यात तर आणखी हाल होत असून, एक तर गाड्या लेट होतात आणि त्याचबरोेबर तिकिटाकरिताही रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवासीही त्रस्त झाले असून, याबाबत कोणीही आवाज उठवत नसल्याचे महेंद्र बारसिंग या प्रवाशाने लोकमतला सांगितले. (वार्ताहर)
अपु-या तिकीट खिडक्यांमुळे गैरसोय
By admin | Published: July 31, 2014 1:57 AM