मुंबई : मुंबई विद्यापीठात शनिवारपासून पार पडणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तज्ज्ञांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. राहण्याची व्यवस्था, गाड्या वेळेत उपलब्ध न होणे आदी समस्यांमुळे विद्यापीठात दाखल झालेले पाहुणे हैराण झाले आहेत. एका वैज्ञानिकाला किरकोळ अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांनी विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ३ ते ७ जानेवारीदरम्यान इंडिनय सायन्स काँग्रेस पार पडत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात देशविदेशातील सुमारे १२ हजारांहून अधिक वैज्ञानिक सहभागी होणार आहेत. उद्घाटनाच्या आणि त्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी विद्यापीठात दाखल झालेल्या पाहुण्यांना गैरसोईचा फटका बसत आहे.कलिना कॅम्पसमध्ये आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या निवास्थानापर्यंत जाण्यासाठी वेळेत गाडी उपलब्ध होत नसल्याने त्यांना तास तास गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. शुक्रवारी दिल्लीहून आलेले एक वयोवृद्ध वैज्ञानिक कलिना कॅम्पसमध्ये एका व्यक्तीचा धक्का लागल्याने खाली पडले. त्यांना उपचारासाठी कलिना येथील हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र या ठिकाणी कोणी डॉक्टर नसल्याने अखेर परिषदेनिमित्त पालिकेने पाठविलेल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले.परिषदेला मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहणार असल्याने पालिकेनेही विविध सुविधा पुरविल्या आहेत. मात्र कॅम्पसमध्ये आलेल्या रुग्णवाहिका कोणत्या ठिकाणी उभ्या कराव्यात, याबाबतचे कोणतेही नियोजन विद्यापीठाकडे नसल्याने या कर्मचाऱ्यांनाही त्रासाला सामोरे जावे लागले. परिषदेतील वक्त्यांना विद्यार्थ्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्याने काही वक्त्यांनी नाराजी व्यक्त केली.गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठ या परिषदेची तयारी करीत आहे. मात्र प्रशासनाकडे परिषदेबाबत व्हिजन नसल्याने गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाने भव्य मंडप उभारण्यात केलेल्या खर्चाऐवजी एखादी इमारत उभारली असती तर याचा फायदा विद्यापीठाला झाला असता. विद्यापीठाची टेनिस कोर्ट, आयुर्वेदिक गार्डनची जागा उपलब्ध असतानाही प्रदर्शनासाठी बीकेसी मैदान घ्यावे लागले, हे विद्यापीठाला शोभणारे नाही, असे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)च्कलिना कॅम्पसमध्ये आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या निवास्थानापर्यंत जाण्यासाठी वेळेत गाडी उपलब्ध होत नसल्याने त्यांना तास-तास गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे.च्परिषदेतील वक्त्यांना विद्यार्थ्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्याने काही वक्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
परिषदेतील पाहुण्यांची गैरसोय
By admin | Published: January 03, 2015 2:15 AM